विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या 

‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

 कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका 

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळत असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील अन्य दोन माजी संचालकांना आज सीआयडीच्या पोलिस उपअधीक्षकांनी चाप लावला. खारघर आणि खारपाडा येथून दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मुख्य आरोपी विवेकानंद पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.

भालचंद्र ऊर्फ भाई तांबोळी (मूळ गाव वेश्‍वी, सध्या रा. पनवेल) आणि डॉ. अरिफ दाखवे (रा. बारापाडा, पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही माजी संचालकांची नावे आहेत. सीआयडीच्या उपअधिक्षिका मीना जगताप यांनी बर्‍याच कालावधी नंतर अटेकचा पाश आवळला असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात मशगुल झालेले कर्नाळा बँकेचे अनेक माजी संचालक सकाळपासून धुम ठोकून मिळेल त्या दिशेने पळत सुटले आहेत.

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सीआयडीने अटकेची कारवाई केलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. मुख्य आरोपी विवेकानंद पाटील हे ईडीच्या अखत्यारितीत तळोजा कारागृहाच्या कोठडीत आहेत. तर बँकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक हेमंत सुताणे तळोजा कारागृहात आहेत. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके कल्याण महिला कारागृहात आहेत.

शेकापच्या कार्यालयापासून महत्वाच्या बैठका ते आंदोलनात वडापाव ते बिर्याणीपर्यंत आणि आर्थिक सेवा पुरवण्यात भालचंद्र तांबोळी गेल्या चार दशकापासून विवेकानंद पाटलांसोबत अग्रेसर होते. याशिवाय ‘पाटलांचा वाडा आणि माडी’ सजविण्यात डॉ. अरिफ दाखवे वाक्बगार होते. जमिनीच्या व्यवहारांचेही ते साक्षीदार आहेत. पाटलांना हवं, नको ते पुरवणार्‍यांच्या यादीत हे दोन्ही चेहरे आघाडीवर राहिल्याने त्यांना कर्नाळा बँकेच्या संचालक पदाची वतनदारी बहाल केली होती. त्यांचा नवा प्रवास आजपासून कारागृहाच्या कोठडीच्या दिशेने सुरु होण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीचे नेते छाती ताणून लोकसभा निवडणुकीत उतरले होते. त्यात कर्नाळा बँकेचे माजी संचालकही सहभागी झाले होते. सीआयडीने अलगद चाप ओढल्याने दोन शिकारीच सीआयडीच्या जाळ्यात अडकले आहेत. बाकीचे घर सोडून पुन्हा पळून गेले आहेत.

पाटलांच्या जामीनासाठी अर्ज दाखल 

उच्च न्यायालयात कर्नाळा बँकेचे मुख्य आरोपी विवेकानंद पाटील यांच्या जामीनासाठी अर्ज दाखल असताना आज, बुधवारी (ता. 15) पनवेल येथील न्या. पालदेवार यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पाटील यांच्या वकिलांनी यापूर्वी एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याने तो रद्द करावा, अशी मागणी करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर आज सुनावणी झाली. ते प्रतिज्ञापत्र मागे घेण्याची तयारीही वकिलांनी दर्शविली. याशिवाय आज विवेकानंद पाटलांच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. पहिला जामीन अर्ज ईडीच्या उच्च न्यायालयात केलेला आहे.


उद्या करणार आरोपींना न्यायालयात हजर 

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील सीआयडी पथकाने आज ताब्यात घेतलेल्या भाई ऊर्फ भालचंद्र तांबोळी आणि डॉ. अरिफ तांबोळी यांना उद्या गुरुवारी ( ता. 16) पनवेल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याचे घवघवीत यश

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे अनेक नेते अटकेच्या फासात अडकले असतानाही ते निधड्या छातीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. मतदानाचा सूर्य मावळतीला गेल्यानंतर काही तासातच सीआयडीची कारवाई झाली आणि दोन मुख्य मोहरे अटकेच्या कारवाईत अडकले. 

पनवेल संघर्ष समितीने सातत्याने या संदर्भात पत्र व्यवहार आणि फोनद्वारे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

बँक बुडीत प्रकरणात आरोपी असलेले अनेक माजी संचालक नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात उतरले होते. त्यामुळे कायदा वा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत होते. आरोपींना कायद्याचे भय उरले नसल्याने समितीने पुन्हा पाठपुराव्याला जोर लावला आणि मतदानाचा उत्सव होताच 48 तासात दोघांना अटक झाली. आता उर्वरित शेकापचे अन्य आरोपीही जात्यात असल्याचा दावा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केला आहे.

‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या!



‘ही’ तर लोकनेते दि. बा. 

पाटलांची वैचारिक हत्या! 

- कांतीलाल कडू

विशेष संपादकीय

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. त्यांच्या मते तो ‘वध’ होता. हत्या म्हणण्याचे धाडस आणि सत्याची छाती त्यांच्याकडे नसल्याने बदला घेतला, सूड उगारला असा बुद्धिभेद करून सहानुभूती मिळवण्याचे विकृत चाळे आजही सुरूच आहेत. त्यात आता लोकनेते, शेतकर्‍यांचे कैवारी दि. बा. पाटील यांच्या ‘विचारांची हत्या’ सुद्धा याच वर्गाने केली आहे. त्याच्या मते हवे तर तो ही ‘वध’ ठरावा, अशी त्यामागे त्यांची अंतरिक भावना नक्कीच असणार आहे.

खारघर येथे मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारासाठी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय सभा काही भुमाफियांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी म्हणे, नवी मुंबईतून विमान उडेल तेव्हा ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे’, अशी उद्घोषणा होईल. ही पुडी देवेंद्र फडणवीस यांनी सोडली तेव्हा व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या ‘देवेंद्र भक्तांना’ त्यांनी ‘ठार वेडे’ ठरवून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले असे म्हणायला हरकत नाही. मुळात देवेंद्र फडणवीस नेहमी जातीचा उल्लेख करतात म्हणून संदर्भासाठी सांगावंस वाटते की, ‘ब्राह्मण सत्यवचनी असावा. औषधालाही त्याला खोटं बोलण्याचा अधिकार नाही’. इथं मात्र, देवेंद्र फडणवीस म्हणजे दुर्गुणांनी ओतप्रोत भरले आहेत. त्यातही खोटं बोलण्यात नखशिखांत बुडाले आहेत. ते पावलोपावली खोटं बोलतात हे गेल्या नऊ वर्षात महाराष्ट्राने अनुभवले आहे. नागरिकांना त्याची प्रचिती आलीच आहे.

अगदी तीन-चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सभा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. तेव्हा दि. बां. च्या नावाचा मोदीजींनी ‘परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी’, यापैकी कोणत्याही वाणीतून उच्चार केला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ‘कीर्तीचा तेजाब’ मोदीजी आणि त्यांच्या संघ परिवाराला मान्यच करायचे नाही. मुंबईतून हुतात्म्यांच्या भूमीत आलेल्या राष्ट्रीय उड्डाणपुलाही, सेतूला त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले. वास्तविक, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोबतीने देशस्तरावर काम करणार्‍या अनेक विभूती महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यात कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रेहमान अंतुले होते. परंतु, ते जातीने मुसलमान, ही मोदीजींना अडचण ठरली असेल. त्याहीपेक्षा मुंबई हल्ल्यातील कसाब ऑपरेशनवर अंतुले यांनी लोकसभेच्या सभागृहात आरएसएसला लक्ष्य केले होते. दुर्दैवाची बाब म्हणजे तेव्हा अंतुले यांना वेड्यात काढले होते. निवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांनी त्यांच्या ‘व्हू किल्ड करकरे’ या पुस्तकात प्रश्‍नांकित वादळ पेरले आहे. करकरे यांच्या शरीरात शिरलेल्या गोळ्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट काही भलतंच सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तोच आरोप आज, मुंबईतील भाजपाचे उमेदवार ऍॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर उलटत आहे.

दुसरे असे की, मधू दंडवते हे कोकण रेल्वेचे जनक मानले जातात. त्यांचे नावही अटल सेतूला संयुक्तिक ठरले असते. याशिवाय कामगारांचे जीवश्य: कंठश्य प्रामाणिक कामगार नेते, ‘बंद सम्राट’ जॉर्ज फर्नांडिस यांचेही नाव दिले असते तर काही गैर ठरले नसते. कोकणात अनेक राष्ट्रीयस्तरावर नाव कमाविलेले विविध क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांना टाळून अटलजी बिहारींना स्थानिक, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या छाताड्यावर बसविले. ही भाजपाची खेळी आहे. भविष्यात इथल्या विमानतळाला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा याचा नातू ‘सेक्स कँडल फेम’ रेवण्णा देवेगौडा किंवा महाराष्ट्रात ज्यांनी भाजपाच्या फडाचा डफ वाजवून ईडीच्या नावाने नंगानाच केला, त्या किरीट सोमय्यांचेसुद्धा नाव दिले जावू शकते. कुणीही फार भ्रमात राहू नये. मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. आम्ही काही दिवसांपूर्वीच, ‘अतुल पाटलांनी (दिबांचे चिरंजीव आणि वैचारिक मारेकरी) बारणेंची सुपारी घेवू नये’, हे वृत्त प्रकाशित केल्यापासून स्थानिकांच्या स्वाभिमानाचा ‘लाव्हारस’ धगधगत आहे. मतपेटीत त्याचा विस्फोट होण्याच्या भीतीने फडणवीस यांनी या मुद्द्याला स्पर्श केला, इतकंच त्यामागील इंगीत आहे. विमानतळाला विरोध होता. 14 गावे विस्थापित होणार या भीतीने त्यांनी मतपेटीतून रोष व्यक्त केला आणि शेकापच्या विवेक पाटलांना उरण मतदार संघातून धुळीस मिळविले. हा इतिहास ताजा आहे. त्याची पुर्नरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेवून फडणवीस यांनी मधाचे बोट पुन्हा स्थानिकांच्या ओठाला टेकले आहे. बस्स इतकंच! बहुजन समाजाला नागवून पुन्हा एकदा पेशवाईचे राज्य आणायचे आहे. त्यासाठी खांदेही आपले आणि शिकारसुद्धा आपलीच केली जाते, याचे भान दुर्दैवाने आपल्याच लोकांना राहिले नाही.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ, होत असलेला विलंब यातून हे स्पष्ट होत आहे दिबांच्या नावाला न्याय द्यायचा नाही. मात्र, मावळ लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सपशेल पराभव दिसू लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी  नैराश्यातून दि. बा. च्या उद्घोषणेचे ‘लॉलीपॉप’ दाखवून ‘सामूहिक संमोहन’, करण्यात बाजी मारली आहे. पण, त्याचे बुमरँग भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निश्‍चित दोन्ही निवडणुकीत उलटणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे राज्यात सरकार असताना भाजपाने फूस लावून लोकांना लाखोंचे आंदोलन करायला भाग पाडले. लोकांनी दिबांवरील प्रेम, आत्मियता, श्रद्धा, निष्ठेचे पाईक होवून आंदोलने छेडली. यात फडणवीस, ‘ठाकरे सरकार’ अस्थिर करण्यात यशस्वी जरी झाले नसले तरी तत्कालीन सरकारविरोधात लोकांच्या मनात दिबांच्या नावाला विरोध केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि त्यांचे तत्कालीन सहकारी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात चीड निर्माण करण्यात देवेंद्रजी यशस्वी झाले. नियतीने हा ‘गेम’ आता त्यांच्यावर उलटवला आहे. ‘आता बोला, नावाची अधिसूचना कधी करता?’, असा एकच निर्धार जनतेने, दिबाप्रेमींनी मनाशी केला आहे. नावाची उद्घोषणा होईल तेव्हा होईल. पण केंद्र सरकारने हे प्रकरण दाबून ठेवले आहे. हे षडयंत्र आहे. ते इतक्या लवकर लक्षात येणार नाही. जेव्हा येईल तेव्हा फारच उशीर झालेला असेल आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर अजिबात विश्‍वास ठेवता येणार नाही. असेही त्यांनी रायगड आणि नाशिकमधून आगरी उमेदवार हद्दपार केले आहेत.

आपले नेतृत्व नसेल तर व्यथा कोण मांडणार? भुमाफिया, चोरांची त्यांच्यापुढे अजिबात डाळ शिजत नाही. एकूणच ही विमानतळाच्या नामकरणाची लोणकढी सोडली असेल तरीही लोकनेते दिबांच्या वैचारिकतेची ही हत्या आहे. त्यांच्या संघर्षमय लढ्याचा हा अंत ठरवत आहेत. एकूणच मधाची धार सत्तेच्या तलवारीवर ओतून दिबा आणि आगरी समाज, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार अगदीच ‘बहुजन समाजाचा वध’ केला आहे. नाही! ही तर ठरवून केलेली त्यांच्या विचारांची हत्या आहे.

अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये!

अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारचे मानसिक संतुलन बिघडल्याची स्थिती आहे. त्यात नाव देण्याच्या धरसोड वृत्तीने स्थानिक, प्रकल्पग्रस्त तसेच अठरा पगड जातीच्या दिबाप्रेमींमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी असताना दिबांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी सुपारी वाजवून मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना एकतर्फी पाठिंबा देण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याने बारणे यांच्यासाठी मोठा धोका ठरणार आहे.

पनवेल, उरण आगरी समाज परिषदेचे अपघाती अध्यक्ष असलेले अतुल पाटील यांनी समाज, कृती समितीला विश्‍वासात न घेता कुठल्या तरी शेठजीच्या इशार्‍यावर अतुल पाटलांनी शेपूट हलवून थेट बारणे यांना एकतर्फी पाठिंबा दिल्याने आगरी समाजासह अठरा पगड जातींचा त्यांनी विश्‍वासघात केल्याचा घणाघात पाटील यांनी करून येत्या दोन-तीन दिवसात पत्रकार परिषद घेवून यावर संघटनेची स्पष्ट भूमिका घोषित करणार असल्याचे दै. निर्भीड लेखशी बोलताना सांगितले.

पाटील अत्यंत रोषपूर्वक म्हणाले की, अतुल हे दि. बा. पाटील यांचे पुत्र असले तरी दिबांच्या कोणत्याही आंदोलनात त्यांचे योगदान राहिलेले नाही. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यावरून स्थानिक, प्रकल्पग्रस्त आणि पनवेल, उरण, बेलापूर, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, भिवंडी, कल्याण विधानसभा मतदार संघातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्या भावना अतुल पाटील यांनी पायदळी तुडवून घेण्यासाठी राजकीय भाटांची सुपारी घेवू नये, असा इशारा दशरथ पाटील यांनी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मावळचे उमदेवार श्रीरंग बारणे चांगलेच अडचणीत आले आहेत.

दशरथ पाटील पुढे म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्य सरकारने दिबा पाटील यांच्या नावाची अधिसूचना जाहीर केली नाही तर 24 जूनपासून उग्र आंदोलनास प्रारंभ केला जाईल. त्यामुळे अतुल पाटलांनी उगीच शेठजीची सुपारी घेवून आगरी समाजाशी द्रोह करू नये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती वेळ पडल्यास तटस्थ राहण्याचा निर्णय घेईल. मात्र, कुणाच्या वळचणीला एकतर्फी जाणार नाही, असा इशारा देवून समाजाच्या विविध पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी चर्चा करून अतुल पाटलांच्या विकावू भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा नाहक फटका आता श्रीरंग बारणे यांना बसणार असल्याचे दिसते.


समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न 

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यावरून केंद्र व राज्य सरकारने टाळाटाळ सुरु ठेवली आहे. आगरी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौर्‍यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम विमानतळाच्या जागेवर झाला. त्यावेळी अतुल पाटील यांच्या कपाळी मुंडावळ्या बांधून भाजपा नेत्यांनी प्रेषकांच्या गर्दीत बसविले होते. परंतु, मोदी यांनी लोकनेते दिबा पाटलांच्या नावाला बगल दिल्याने रायगड, मावळ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, पुणे परिसरात प्रचंड नाराजी पसरली आहे. हा केवळ दिबा पाटील यांचा अवमान नसून महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकर्‍यांचा अपमान आहे. त्याचे पडसाद मतपेटीतून उमटतील, अशी अपेक्षा आहे. शिवाय आता जो काही डोंबार्‍याचा खेळ सुरु आहे, त्यातून आगरी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न आहे.

- सुप्रिया पाटील, (राजकीय विश्‍लेषक)


वैचारिक वारसा लोप पावला!

 वैचारिक वारसा लोप पावला! 

- कांतीलाल कडू

अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच्या विकास पर्वाचे शिल्पकार प्रभाकर पाटील यांची कन्या आणि थोडी ओळख जरा वेगळी परंतु, ती टाळता येण्यासारखी नसल्याने तो उल्लेख आदरानेच करावा लागेल, ते म्हणजे कॉंग्रेसचे कट्टर नेते प्रा. जयदास पाटील यांच्या पत्नी मीनाक्षीताई पाटील ऊर्फ बेबीताई यांची आज प्राणज्योत मालवली. ही नात्यांची अफलातून श्रृंखला त्यांच्या जीवनात काटे आणि फुलांचा गालिचा पसरत गेला तो अखेरपर्यंत. म्हणूनच काही उल्लेख टाळता येण्यासारखे नव्हते, असे म्हणावे लागते. यापेक्षा वेगळं क्षितिज त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केले, त्याचे हे अधिष्ठान होते. लढाईचे सुदर्शन चक्र त्यांच्या हाती होते, ही तीन नाती म्हणजे त्या चक्राचे भक्कम कडे होते, त्यामुळे त्या नात्यांचा ओलावा त्यांच्याभोवती कायम राहिला. ही त्यांची भावनिक पण भक्कम बाजू राहिली आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे तारणहार समजले जाणारे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मीनाक्षीताई पाटील यांच्याकडे बंदर विकास खात्यापासून अनेक प्रकारची खाती होती. शेकाप आणि कॉंग्रेस म्हणजे सद्य: स्थितीत वर्णन करायचे तर ईडी आणि विरोधक. शेकाप ईडीच्या भूमिकेत होता. राज्यभर त्यांचा दरारा होता. राज्याच्या राजकारणात वैचारिक दबदबा होता. विरोधी पक्ष असताना सक्षमपणे कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना धोबीपछाड देत. कॉंग्रेस आणि शेकाप यांचे रायगडात साप मुंगसाचे नाते राहिले आहे. दगडापासून, तलवारीपर्यंत, कोयत्यापासून कुर्‍हाडीपर्यंत आणि पोकळ बांबूंपासून ते भाले, बरची अशी टोकदार, धारदार हत्यारांनी दोन्ही पक्षाचे नेते आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या घरी भात साठवण्यासाठी असलेली कणगी भरून ठेवली जात होती आणि निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’ला लाजवेल असे रक्तरंजित हल्ले, प्रतिहल्ले घडवून आणले जात होते. इतकी पराकोटीची दुश्मनी दोन्ही पक्षात होती. आज त्याचे मैत्रीत झालेले रूपांतर फक्त मतांच्या स्वार्थी पेटीतील राजकारण आहे. त्याला काहीही अर्थ नाही, आहे तो फक्त बागुलबुवा!

तर मीनाक्षीताई पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग-उरणच्या तीन वेळा आमदार होत्या. जिल्हा बँकेच्या संचालिका राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्या ते मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षाही होत्या. राज्यात विलासराव देशमुख यांच्या राज्याभिषेकासाठी मॅजिक आकडा जुळवता येत नसल्याने शेकापने ती संधी साधली आणि पहिल्यांदा सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यास प्रखर विरोध केला. शेकापचे जयंत पाटील यांनी तटकरेंना तेव्हा केलेला विरोध म्हणजे आता शिवतरे यांनी डमरु वाजवत अजितदादा पवार यांच्याविरोधात राळ उठवली होती, तसा काहीसा प्रकार होता. साधारण एकविसाव्या दिवशी विलासरावांनी जयंत पाटलांना गुंडाळले. जसे देवेंद्र फडणवीस यांनी शिवतरे आणि महादेव जानकर यांचा पोपट केला, अगदी त्याच धर्तीवर...!

मीनाक्षीताई पाटील, ज्येष्ठ नेते आबा ऊर्फ गणपतराव देशमुख आणि पेणचे मोहनभाई पाटील हे तीन शेकापचे मोहरे पहिल्यांदा कॉंग्रेसच्या ओंजळीने पाणी पित मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. नाही म्हणायला शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्यावर केलेल्या खंजीर प्रयोगात शेकाप सहभागी होताच. शेकापचे दिवंगत नेते प्रा. एन. डी. पाटील पवारांच्या पुलोदमध्ये सहकार मंत्री राहिले होते. थोडक्यात काय तर नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटील यांनी ज्या कॉंग्रेसला डोळ्यासमोर धरले नाही, त्याच कॉंग्रेसने शेकाप वेळोवेळी जिवंत ठेवला आणि कॉंग्रेस मात्र ‘मरणपंथी’ लागली. ही शोकांतिका म्हणण्यापेक्षा कॉंग्रेस नेत्यांच्या लाचारीचा सर्वात मोठा ‘विषप्रयोग’ रायगडाला भोवला. 

मीनाक्षीताई पाटील यांचे राजकीय कर्तृत्व हे डाव्या विचारसरणीचे असले तरी त्यांनी कधीच कुणाला दंश केला नाही. हयातभर ती पेटलेली पणती इतरांना प्रकाशाच्या मार्गावर नेताना स्वतःला चटके देत आज अखेर निमाली. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील ऐकलेपणा त्यांनी कधीच डोळ्यांच्या कडांतून वाहू दिला नाही. संघर्ष, लढाई, वैचारिक हल्ले परतवून लावताना त्यांनी कधीच हातचे राखले नाही आणि उगीच कुणावर कधीही रोष, सूड उगारला नाही. बेरजेचे राजकारण करताना त्यांनी अनेकदा शेकाप नेत्यांच्या चावडीपेक्षा कॉंग्रेस नेत्यांच्या घरचा चहा, मासळी भाकरी पसंत केली आणि त्यातून राजकीय वैर मिटवण्याचे संकेत दिले. शेकाप, कॉंग्रेस म्हणजे ‘स्पृश्य अस्पृश्यते’ची ‘लक्ष्मण रेषा’ होती. भयानक, अतिभयानक, ज्याचे वर्णन करताना भय रसाचा समुद्रसुद्धा रोडावून जाईल... इतकी भयानता होती दोन्ही पक्षात. तेव्हा ताई समतेचे, बंधुत्वतेचे, मायेचे आणि आपुलकीच्या राजकारणातून समाजकारण करीत होत्या.

मीनाक्षीताई, राजकारणात येण्यापूर्वी प्रभाकर पाटील यांच्या सावलीत पत्रकारितेचे धडे गिरवत होत्या. 1977 ते 1995 पर्यंत त्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यांच्याच काळात रायगड जिल्हा पत्रकार भवनाची इमारत उभी राहिली आहे. तेव्हा राज्यात मोजक्या चार ते पाच पत्रकार भवनाच्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. मीनाक्षीताईंच्या नेतृत्वाखाली रायगडचा स्वाभिमान जपला गेला आणि पत्रकारांना हक्काचे छप्पर मिळाले. खरं तर मीनाक्षीताईंसोबत कॉंग्रेस विचारसरणीचे पत्रकारही राजाभाऊ देसाई, नारायण मेंगडे, दा. कृ. वैरागी आणि त्यांचे बंधू यांच्याशी त्यांचे उत्तम राजकीय, सामाजिक संबंध राहिले होते. 

बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांनी जाचक प्रेस बिल आणले, त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटले. राज्यभर निषेधाचे मोर्चे निघाले. त्यात सोलापूर येथे झालेल्या आंदोलनात मीनाक्षीताई सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांची धरपकड करण्यात आली. पुढे औरंगाबाद येथील कडसूळ कारागृहात पंधरा दिवसांचा त्यांना कारावास भोगावा लागला होता. बेळगाव सीमा वाद प्रकरणात पत्रकारांनी केलेल्या आंदोलनास मुंबईत पोलिसांचे कडे भेदून जाणारी रणरागिणी म्हणजे मीनाक्षीताई पाटील होत्या. तर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली झालेल्या आंदोलनात सुलभाकाकू (ताईंची आई) सोडल्या तर पेझारीचे अख्खं पाटील कुटुंबं सहभागी झाले होते. 1998 मध्ये उरणातील बीपीसीएलवर काढलेल्या मोर्चात आकाशातून वीज तुटून पडावी, तशा ताई कंपनीविरोधात आग ओकून स्थानिकांमध्ये चैतन्य पेरत होत्या.

राज्याच्या पवित्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून मनसेच्या तेरा आमदारांनी ज्येष्ठ सदस्य अबू आझमी यांच्यावर जो हल्ला केला, त्यावेळी मीनाक्षीताई पाटील एकट्या वाघिणीसारख्या आझमींच्या मदतीला धावल्या नसत्या तर सभागृहाच्या भिंती रक्ताने न्हावून निघाल्या असत्या. इतक्या प्रेमळ, धाडसी आणि तितक्याच कठोरतेने प्रहार करत त्या सरकारवर तुटून पडत असत. सभागृहात वैचारिक मुद्दे मांडताना इतर पक्षाचे आमदार नेहमीच हाताची घडी घालून त्यांना ऐकत असत. सभागृह आणि बाहेरील त्यांची भाषणे यात कधीच तफावत राहिली नाही. जे पोटात ते ओठावर अशी त्यांची ओळख राहिली आहे. अलीकडे त्यांचा एका आजाराने पाठलाग केला. त्यावर उत्तम उपचार झाले होते. त्या कधी अलिबाग तर कधी नवी मुंबईत वास्तव्याला होत्या. चिरंजीव आस्वाद पाटील यांनी त्यांना फुलासारखे जपले. पण विश्‍वनियंत्याने आस्वाद पाटलांना आज पोरके करून त्यांचे मायेचे आभाळ हिरावून घेतले. राज्यातील रणरागिणीला कायमची विश्रांती मिळाली. त्यांच्या आठवणींचा झुंबर शेकाप आणि कष्टकरी, वंचितांच्या मनात कायमच प्रज्वलित राहिल यात वाद नाही.

पानसरेंनी ‘विवेक’ जपला!

पानसरेंनी ‘विवेक’ जपला!

विशेष संपादकीय

- कांतीलाल कडू

थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल मीडिया फेम कुविख्यात टोळीप्रमुख राहुल पाटील याला पनवेल पोलिसांनी अखेर ‘खाक्या’ दाखवत त्याच्या घरातून उचलून आणले. 

ओवळे येथे बैलगाडा शर्यतीत पराभव झाल्यानंतर हवेत गोळीबार करून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणे, गैर कायद्याचा जमाव जमवून दगडफेकीतून सामाजिक अशांतता निर्माण करणे, हल्ला घडवून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणे आदी त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे आहेत. ही त्याची पहिली वेळ आहे, असेही नाही.

यापूर्वी दिवंगत पंढरीनाथ फडके यांच्यावर गोळीबार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तेथील पोलिसांनी राहुल पाटीलवर काहीच कारवाई केली नाही. पुढे कल्याणमध्ये जमिनीवरून झालेल्या राड्यात चक्क पोलिस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी राहुल पाटील आणि साथीदारांवर गोळीबार केला. त्यात तो सुदैवाने वाचला. तरीही त्याची गुंडगिरीची खुमखुमी कमी झाली नाही. नाही म्हणायला ते सुद्धा त्या-त्या पोलिस ठाण्याचे अपयश मानावे लागेल. 

ठाणे, कल्याण, भिवंडी भागात हैदोस माजविणार्‍या मंचेकर टोळीतील 49 जणांचा चकमकीत खात्मा केल्याचा रेकॉर्ड महाराष्ट्र पोलिसांच्या नावावर आहे. त्यांच्यापुढे राहुल हा किरकोळ गुंड आहे. जेव्हा मुंबई, महाराष्ट्रात गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढतात किंवा त्या पोसल्या जातात, तेव्हा त्यांना निश्‍चितच राज्य आणि केंद्रातील सत्ताधार्‍यांचे अभय असते. हे सध्याच्या सरकारच्या बाबतीत घडते असे नाही. कॉंग्रेसच्या किंवा बिगर कॉंग्रेसच्या बाबतीतही तेच घडते. अगदी गुन्हेगारीवर बोलायचे तर त्याचे एक स्वतंत्र दालन भरेल, इतकी पुस्तके त्यावर प्रकाशित झाली आहेत. 

मुंबईत जेव्हा दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांनी राजकीय पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले होते, त्यांचे मुडदे पाडले जात होते, तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ (अरुण गवळी) अशा आशयाचे संपादकीय लिहिले होते. यातून टोळ्यांचे राजकीय समर्थन आणि उदात्तीकरण दिसते, इतकेच स्पष्ट करायचे होते. 

याची दुसरी बाजू अशीही आहे की, पोलिसांनी ठरवले की, ‘गुन्हेगारीचा बिमोड करायचा तर ते त्यांना अशक्य नाही’. तिसरी अधोरेखित बाजू अशीही आहे की, कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करून एखाद्या व्यक्तीचे सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करायचे. हे चक्र पोलिस खात्याला कधी चुकले नाही. कधी कधी मग पोलिस अधिकार्‍यांचाही ‘करेक्ट कार्यक्रम’ झालेला आहे. कर्मगती कुणाला चुकली नाही, चुकत नाही, चुकूच शकत नाही.

याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खाकेत सुरक्षित असल्यागत राहुल पाटील याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हैदोस माजविला आहे. त्याला आभाळ दोन बोटं उरल्यागत तो बेधुंद होवून वागत होता. राज्याचे पोलिस दल त्याच्या पलंगाखाली ओलिस ठेवाल्यागत तो धुडगूस घालत होता. त्याचे पंख छाटण्याचे धाडस पनवेल शहर पोलिस, उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली केले. त्यामुळे पनवेल परिमंडळ 2 मधील पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. 

विवेक पानसरे हे जितके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, तितकेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. मध्यंतरी पानसरे यांच्या परिमंडळ 1 मधून (वाशी, नवी मुंबई विभाग) बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. तेव्हा शंभूराज देसाई, दीपक केसरकर या दोन मंत्र्यांनी ‘पत्रबॉम्ब’ पाठवून पानसरे यांची पाठराखण केली आणि त्यांच्या विरोधकांसह बदलीला ‘ब्रेक’ लावला होता. 

पनवेलचा पदभार स्विकारल्यानंतर मुंबई ऊर्जा प्रकरणात स्थानिक आमदारांना जे जमले नाही, ते पानसरे यांनी करून 24 तासात फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवून आंदोलनास स्थगिती मिळवली. आताही गेल्या आठवड्यात फडणवीस पनवेलला येवून मोठा ‘पुरावा’ ठेवून गेलेत, त्याचेही श्रेय अर्थातच पानसरे यांच्याकडे जाते. त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी यापूर्वी पनवेल हाताळले आहे. त्यांचाही दांडगा अनुभव आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे हे गुन्हे प्रकटीकरणात तरबेज आहेत. शिवाय ते गाजलेले दिवंगत पोलिस अधिकारी वसंत वाघ यांचे सख्खे जावई आहेत. 

पूर्वी वसंत वाघ म्हटले की, गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांची बोबडी वळायची. त्यामुळे ठाकरे यांच्यावर सासरेबुवांची कीर्ती वाढवण्याबरोबर पोलिस दलाला अधिक शुचिर्भूत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. वाघ कधीच राजकीय नेत्यांच्या ओंजळीने पाणी प्याले नाहीत. त्यांच्या अडोश्यालाही लपून राहिले नाहीत. ‘तुमच्या आईचा नवरा जिवंत आहे’, असे सांगून पोलिस दलाला ते प्रोत्साहित करीत होते. तसे ठाकरेही खमके आहेत. त्यांचा कारभार राहुल पाटलांच्या अटकेनंतर तेजाळून निघणार आहे. यामध्ये श्रेय अर्थातच विवेक पानसरे यांना जाते. तसेच ते ‘लोकमत 18 न्यूज’ चॅनेलचे पत्रकार प्रमोद पाटील यांनाही जाते. त्यांनी काल पुन्हा विशेष बातमीपत्र तयार केले, त्याचाही हा परिणाम आहे. तेव्हा पानसरे यांनी ‘विवेक’ जपला. अशोकवनात दुःख, शोक करायची बैलगाडा मालकांना साधी संधीही राजपुतांनी दिली नाही. तर नितीनरावांनी ओरिजनल ‘ठाकरे शैली’ दाखवून राहुल पाटलाला अशी पराणी टोचली की, आता अनेकांचा ऊतमात निघून जाईल.

या सगळ्या प्रकरणातून बडेे राजकीय गुंड, भुमाफियांनी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पदराखाली लपून जे उद्योग सुरु ठेवले आहेत, त्यांनाही मोठा सामाजिक इशारा मिळेल. योग्य ठिकाणी बाण लागलेला आहे, त्याची जाणीव समाजद्रोहींना होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. 

काही जण ‘सुपात’ आहेत, त्यांनाही पानसरे आणि त्यांची टीम जात्यात ओढतील, याची नियती व्यवस्था नक्कीच करेल. तोपर्यंत विवेकरावांनी उरण तालुक्यातील वेश्‍वी गावात 31 जानेवारीला गोळीबार झाला, त्याचा गुन्हा तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश निकम यांना दाखल करायला लावून जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यास प्रवृत्त करावे, म्हणजे न्याय प्रस्थापित होईल. त्या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे, ते प्रकरण दडपले गेले आहे. 

वास्तविक, गोळीबार झाल्यानंतर पोलिस तिकडे पोहचले होते. पण तिकडे दुसर्‍या गुन्ह्यामुळे वेगळे वळण लागले आणि राजकीय नेत्यांनी फायदा उचलत शांत रसाच्या सतिशरावांना गुंडाळले. मात्र ‘कोंबडं कितीही झाकले तरी तांबडं फुटायचं राहत नाही’. जसं आज राहुल पाटील याची अटक झाली, तसाच वेश्‍वी प्रकरणात पानसरे यांनी ‘विवेक’ जपावा, इतकंच सांगावंसं वाटतं.

टोलवरून कॉंग्रेस सोडलीत, आता भाजपा सोडणार का ?

टोलवरून कॉंग्रेस सोडलीत, 

आता भाजपा सोडणार का ? 

  • आ. प्रशांत ठाकूर यांना सामाजिक कार्यकर्ते 
  • कांतीलाल कडूंचा जहरी सवाल 
  • सागरी अटल सेतूवरील फास्ट टॅगमधून 
  • स्थानिकांची होणार लूट

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

‘भ्रष्ट वारसा’ असलेले आ. प्रशांत ठाकूर, ‘भुमाफिया’ माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि ‘नारळतोड्या’ फेम गटनेते परेश ठाकूर यांची जन्म, कर्मभूमी असलेल्या गावाजवळून जाणार्‍या न्हावा शेवा सागरी सेतूवर राज्य सरकारने फास्ट टॅग केंद्र उभारले आहे. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयात स्थानिकांना टोलमध्ये सवलत देण्याचा कोणताही ठराव पारित न केल्याने आता आ. प्रशांत ठाकूर टोलधाडवरून राज्य सरकारला खडसावत भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देण्याचे धारिष्ट दाखवतील का, असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कांतीलाल कडू यांनी उपस्थित केला आहे.


टोल नाक्याचा मुद्दा उचलून कॉंग्रेसमधून पक्षांतर

  • • 2014 मध्ये राजकीय पराभवाचे सावट दिसताच खारघर टोल नाक्याचा कळीचा मुद्दा बनवून आमदार प्रशांत ठाकूर यांनी तापलेल्या तव्यावर सत्तेची पोळी भाजून कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला होता. 
  • • जनभावनेचा प्रश्‍न असल्याने लोकांनाही भुरळ पडली. त्यातच मोदी लाटेवर स्वार झाल्याने त्यांची नौका तरली. त्यानंतर स्वतः ठाकूर यांनी समाजद्रोह करून पळस्पे जेएनपीटी महामार्गावरील नांदगाव आणि चिर्ले येथील टोलनाक्याचे कंत्राट घेत पुन्हा लोकांना होलसेलमध्ये मूर्ख बनविले.
  • • तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन-पनवेल महामार्गावर टोल नाक्याला परवानगी दिल्यानंतर तेथील पाच गावांतील वाहनांना टोलमधून सूट देण्याची घोषणा केली होती. परंतु, कॉंग्रेसविरोधात राजकीय वारे वाहत असल्याने टोलचे भूत लोकांमध्ये नाचवून कॉंगेस आघाडी सरकारविरोधात रास्ता रोकोतून रणकंदण माजविण्याचे नाटक वठविले होते.

आता राजीनामा देवून पुरुषार्थ दाखवावा! 

  • • आता भाजपाप्रणित महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. न्हावा शेवा अटल सागरी सेतू न्हावेखाडी, शिवाजी नगर, गव्हाण कोपर, जासई आणि चिर्ले येथून जात आहे. 
  • • न्हावे, गव्हाण, जासई आणि चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांना वाहन टोल भरून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे स्थानिकांवर टोलनाका लादला जाणार आहे. 
  • • वास्तविक हिवाळी अधिवेशनात यावरून प्रश्‍न उपस्थित करून पनवेल आणि उरणच्या आमदारांनी सरकारला आधीच इशारा देणे गरजेचे होते. 
  • • परंतु, मिंदे आमदारांना जनतेचे काहीही पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात हे धाडस नसल्याने जनतेची सरकारकडून लूट होणार असल्याचा स्पष्ट इशारा कांतीलाल कडू यांनी देवून आता आ. प्रशांत ठाकूर यांनी खरंच राजीनामा देवून पुरुषार्थ दाखवावा, असे आव्हान कडू यांनी दिले आहे.


भूखंड हडपण्यात ठाकूर आघाडीवर

  • • सागरी सेतू प्रयोजनानंतर माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी जवळच सिडकोचे दोन भूखंड हडप केले आहेत. एकावर न्हावेखाडी येथे वादग्रस्त रामबाग उभारली आहे. तर दुसरा भूखंड शिवाजी नगर (शेपटीवरचा मामा) या ठिकाणी मैदान तयार करून वृक्ष लागवड करत ती जागा हडप केली आहे. 
  • • यापूर्वी उलवे नोड होताना शिवाजी नगर येथे गावविस्ताराच्या नावाखाली किमान पन्नास एकर जमिन लाटली आहे. म्हणजे प्रकल्प आला की, ठाकुर घर भरून घेतात. जनतेचा कोणताही विचार करत नाहीत, हे उघड आहे, असे गंभीर आरोप करून ठाकुरांच्या भ्रष्ट कारभाराचे धिंडवडे कडू यांनी काढले आहेत.
  • • खारघर टोल नाका प्रकरणी लोकांना फसविले होते. आता तो प्रयोग टाळून भूखंड लाटण्याचा उपद्व्याप सुरु ठेवला आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी ठाकुरांच्या कारनाम्याची आठवण देत खिंडीत पकडले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही कृतघ्न!

हिरानंदानी गृहसंकुलांचे काम सुरु असताना तेथील भराव, सपाटीकरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी ठाकुरांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची करून जिंकली अन् ठेका मिळविला. त्यादरम्यान, टीआयपीएल कंपनीकडून वायूवाहिनी फुटली. सुदैवाने  मोठा अनर्थ टळला. वायू कंपनीने आक्रमकता दाखवली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मदतीचा हात देत ठाकुरांना वाचविले. त्याची परतफेड करताना त्यांनाच दोषी ठरवून कॉंग्रेस सोडली. त्याशिवाय काम पूर्ण झाल्यावर खानावळे ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष करून ‘गरज सरो वैद्य मरो’ वृत्ती दाखवून दिली.

धान्यात 'सरकारी भेसळ'

धान्यात 'सरकारी भेसळ'

  • पांढर्‍या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ 

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृत्रिम पौष्टिक तांदळाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रायगड जिल्हा पुरवठा खाते आणि पनवेल तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी अधिक दुर्लक्ष करीत आहेत. केंद्र सरकार आणि आयएफसीची यंत्रणा भेसळखोरीत सहभागी असल्याचा आरोप होत आहे. तर अन्न व औषध प्रशासनाने डोळे मिटून घेतले आहेत. त्यामुळे गरिबांचे पोट बिघडले आहे.

 

सरकारी धान्य दुकाने नेहमी वादाच्या भोवर्‍यात अडकून राहिली आहेत. धान्य वितरण, धान्याचा दर्जा, वजन आणि माप, वेळेचे बंधन त्यानंतर मशीनचा वापर आदी तकलादू धोरणात अडकलेली सरकारी धान्य दुकाने भेसळीची मोठी कारस्थाने ठरली आहेत.

सरकार अनेक उपाययोजना करत असतानाही भेसळ थांबत नाही, बेकायदेशीर साठा थांबत नाही. गैरमार्गाने होणारी विक्रीही जोमात राहिली आहे. गरिबांच्या दातावर मारण्यासाठी सरकारी दुकाने सुरु असली तरी हा घोटाळाही अनेकदा राज्य शासनाच्या अधिवेशनापूर्वी उघडकीस येतो आणि सभागृहात चर्चा होते. पुढे पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

आता, सरकारने गरिबाला पौष्टिक अन्न मिळावे म्हणून त्याला वितरित केल्या जाणार्‍या सरकारी धान्यात पन्नास किलोच्या पोत्यात दहा किलो कृत्रिम प्रथिने असलेला पौष्टिक तांदूळ मिसळले जातात. असे असले तरी सरकारी धान्यात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने त्यातही भेसळ होत असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे.

एकंदर गेल्या काही महिन्यांपूर्वी या धान्यात प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ असल्याचे पीक आले होते, त्यावर उहापोह झाला. परंतु, ते प्रकरण वरिष्ठ पातळीवर दडपण्यात आल्यानंतर आता पुन्हा थोडासा बदल असलेला पांढरा कृत्रिम तांदूळ मिसळून भेसळ केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हा तांदूळ शिजवल्यानंतर चिकट व खाण्यायोग्य नसल्याने त्यातील भेसळ समोर येत असल्याचा सगळीकडे बोलबाला आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार, अन्न धान्य पुरवठा मंत्रालय, आयएफसी, अन्न व औषध प्रशासन, पुरवठा विभाग यांची ठेकेदारासोबत मिलीजुली असल्याचे बोलले जात आहे. त्यातून गरीब जनतेचा जीव टांगणीला लागल्याने कृत्रिम पौष्टिक तांदळाच्या नावाखाली सुरु असलेला काळाबाजार कोण रोखणार, याची चिंता सरकारी धान्य दुकानांच्या लाभार्थ्यांना सतावत आहे.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...