वाकण-पाली राज्य महामार्गाचे काम रखडले 


वाकण-पाली राज्य महामार्गाचे काम रखडले 
वनविभागाचा खोडा: डांबरीकरणाचे कामही अपूर्ण; खड्डे, खराब रस्त्यामुळे वाहनचालकांमध्ये संताप
पाली/प्रतिनिधी
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग रुंदिकरण व कॉंक्रेटीकरण करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाले आहे. मात्र पाली - वाकण या दरम्यानच्या मार्गावर रुंदीकरणासाठी वनविभागाची परवानगी नसणे व इतर भौगोलिक अडचणींमुळे या मार्गाचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण होणार नाही आहे. तसेच दीड महिन्यांपूर्वी येथील उंबरवाडी पासून रस्त्याच्या डांबरीकरणाचे सुरु झालेले काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण अजून किती पावसाळे रखडणार? असा प्रश्‍न उपस्थित होतो. पाली-वाकण मार्गाचे रुंदीकरण न होणे, मार्गावरील मोठाले खड्डे, खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. 
मागील महिन्यात पहिल्या आठवड्यात पाली ते वाकण मार्गावर येथील उंबरवाडी जवळ डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली. आता हा मार्ग खड्डेमुक्त होणार आणि प्रवास सुखाचा होईल या आशेवर प्रवासी व वाहनचालक होते. मात्र डांबरीकरणाचे सुरू झालेले हे काम अवघे काही मीटर पूर्ण झाल्यावर बंद पडले. डांबर उपलब्ध नसल्याने हे काम थांबले असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. मात्र इतके दिवस उलटूनही अजून देखील डांबर आलेली नाही. सध्या अंबा नदी जवळील गिरांबा ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत हे काम झाले आहे. तेथेही एक बाजू अर्धवट अवस्थेत आहे. यापुढे जवळपास वाकणपर्यंत नऊ किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण होणे बाकी आहे. परिणामी या मार्गावरील खड्डे आणि दुरवस्था जैसे थेच राहिले आहेत! त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 
जवळपास २०० कोटी रूपये खर्च करून या रस्त्याचे काम होत आहे. पाली ते वाकण या मार्गावर वनक्षेत्र अधिक आहे. काही ठिकाणी एका बाजूला नदी तर एका बाजूला डोंगर आहे. आणि या कारणांमुळे या मार्गाचे रुंदीकरण होणार नसून आहे तोच मार्गच फक्त दुरुस्त होणार आहे. वाकण ते पाली हा ९ किमीचा मार्ग अतिशय धोकादायक वळणांचा आहे. यामुळे इथे अनेक अपघात होतात. तसेच पावसाळ्यात डोंगरावरील माती व झाडे उन्मळून रस्त्यावर येतात. या कारणांमुळे सर्वप्रथम हा मार्ग रुंदीकरण होणे गरजेचे होते. मात्र हा मार्ग जैसे थेच राहणार आहे. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचा फारसा उपयोग राहणार नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामार्गचे (एमएसआरडीसी) उपअभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले की, या मार्गावर रुंदीकरणास वनविभागाची परवानगी नसणे, तसेच प्रतिकूल भौगोलिक स्थिती यामुळे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण न होता जुन्या मार्गावर डांबर टाकली जाईल, म्हणजेच री सर्फेसिंग करून मार्गावरील असलेले पूल बांधले किंवा दुरुस्त केले जातील.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...