कर्जतमधील एकही गाव-वाडी पाणीटंचाईग्रस्त राहणार नाही: आ. थोरवे
पाणीटंचाई निवारण्यासाठी 50 लाखांची निधी खर्च करणार
टंचाईग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांची माहिती
कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील एकही गाव आणि वाडी पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी टंचाई दूर करण्यासाठी 50 लाखाळचा आमदार निधी दिला जाईल, अशी माहिती कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त भागतील गावे-वाड्या यांचा दौरा सर्व शासकीय अधिकारी यांच्यासह केल्यानंतर पुढील दोन महिन्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात पाणीटंचाईवर मात करणारी कामे झालेली असतील, असा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला असून तालुक्यातील खांडस भागातील पाणी टंचाई भागाची पाहणी पूर्ण झाली असून अन्य भागात देखील अशाच पद्धतीने दौरे आखले जातील आणि कायमचा मार्ग पाणी टंचाई प्रश्नी काढला जाणार आहे.
उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची स्थिती असते. त्यामुळे आदिवासी भागातील लोकांना काही ठिकाणी रात्रभर पणावठ्याचे ठिकाणी बसून राहावे लागते. ही स्थिती लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेण्यासाठी दौरा केला. पहिल्या टप्प्यात खांडस, पाथरज आणि मोग्रज भागातील पाणीटंचाई भागात जाण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे 20 फेब्रुवारीला आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाणी टंचाई पाहणी दौर्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि पाणीटंचाई निवारण समितीचे समन्वयक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, तालुक्याचे तहसिलदार विक्रम देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. डी. कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद गोपणे, शाखा अभियंता मते, सुजित धनगर, आदिवासी विकास विभागाचे तांत्रिक अधिकारी भानुशाली यांच्यासह पाणी टंचाई विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गोवर्धन नखाते, ग्रामसेवक आणि महसूल विभागाचे तलाठी सहभागी झाले होते.
आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, उपसभापती भीमाबाई पवार, माजी उपसभापती सुषमा ठाकरे, सदस्या कविता ऐनकर, माजी सदस्य विष्णू झांजे,खांडस ग्रामपंचायतचे सरपंच मंगल ऐनकर, पाथरज ग्रामपंचायतच्या सरपंच घोडविंदे, अंभेर पाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी तुंगे, मोग्रज ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा देशमुख आदी सहभागी झाले होते. स्थानिक कार्यकर्ते प्रकाश ऐनकर, भरत डोंगरे, प्रशांत झांजे, रवी ऐनकर, अंकुश घोडविंदे, संकेत भासे, अभिषेक सुर्वे आदी उपस्थित होते.
पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडी येथील भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाथरज आश्रमशाळेच्या नळपाणी योजनेसाठी वापरण्यात येणार्या उद्भव विहिरीमध्ये पंप टाकून ते पाणी उचलून दोन इंचाची जलवाहिनी रस्त्याच्या कडेला जमिनीमध्ये टाकून पाणी दोन्ही वाड्यात आणले जाणार आहे. त्या दोन्ही वाड्यात तात्पुरत्या स्वरूपात साठवण टाक्यांमध्ये ते पाणी सोडले जाईल आणि त्या टाक्यांना नळ लावून पाणी पोहचविले जाणार आहे. त्याचवेळी या दोन्ही वाड्यांची 93 लाख रुपये खर्च असलेल्या नळपाणी योजनेला तात्काळ मंजुरी आणली जाईल, असे आश्वासन या दोन्ही वाड्यामधील ग्रामस्थांना आमदार थोरवे यांनी दिले. पुढे गावंडवाडीमध्ये जाऊन आमदार थोरवे यांनी येथील ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर गावंडवाडी येथील मातीच्या बंधार्यांची पाहणी करून त्या बंधार्यात साचलेला गाळ आणि माती यावर्षी मे महिन्यात काढली जाईल, त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आमदार थोरवे यांनी दिल्या.
दुसरीकडे त्याच ठिकाणी एक मोठी विहीर खोदली जाईल आणि त्यासाठी आपला आमदार निधी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले असून पुढील महिन्यात विहीर खोदण्याचे कामाला सुरूवात होईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.