17 फेबु्रवारीपासून मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो सेवा?
अलिबाग/प्रतिनिधी
अलिबागकरांना प्रतीक्षा असलेली रो-रो मुंबई बंदरात दाखल झाली असून येत्या 17फेब्रुवारीला ही सेवा सुरु होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती सरकारने दिलेली नसली तरी सूत्रांनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते रो-रो सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मांडवा ते भाऊचा धक्का अशी रो-रो सेवा सुरु होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष या बोटीकडे होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही रो-रो बोट ग्रीसमधून भारतात दाखल झाली आहे. ‘प्रोटो पोरोस एक्स व्ही’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीची चाचणी तसेच अन्य तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो बोट सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर या बोटीमधून बस कार, बाईक, अन्य वाहने केवळ तासाभरातच अलिबाग गाठता येणार आहे. प्रवाशांसह पर्यटकांची मोठी सोय होणार असून रायगडच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 2016 साली प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली. 135 कोटींच्या या प्रकल्पाचा ठेका डीव्हीपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला. प्रवासी तळ, जेट्टी, ब्रेक वॉटर, टर्मिनल ही प्राथमिक कामे पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रो-रो बोटसेवा सुरू होणे अपेक्षित होते, पण बोट आणण्यामध्ये काही अडचण निर्माण झाली. आता नवा करार करून बोट सेवा सुरु होणार आहे.
रो-रो बोटीमधून 50 वाहने नेण्याची क्षमता असून दीडशे ते दोनशे प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. या बोटीमुळे रोजगार तर वाढेलच, पण मुंबई ते अलिबाग हे अंतर कमी होणार असल्याने त्याचा मोठा फायदा पर्यटन वाढीला होणार आहे. भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा हे 125 किलोमीटरचे अंतर रस्त्याने गाठण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा वेळ लागतो. मात्र रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर केवळ एका तासातच निसर्गरम्य मांडवा गाठता येणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा या प्रवासासाठी साधारणतः एका वाहनासाठी सहाशे ते आठशे रुपये इतके तिकीट आकारण्यात येणार आहे. वाहनाचा प्रकार पाहून कमी अधिक रक्कम होऊ शकेल, असे सांगण्यात येते.