43 कोटी रुपयांची विकासगंगा !
पायाभूत सुविधांसाठी सिडकोकडे पनवेल संघर्ष समितीने नवीन पनवेल, कामोठे, कळंबोलीसाठी सुचवलेल्या कामांना मंजुरी
पनवेल : पायाभूत सुविधा मिळवून रयतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावताना सिडको प्राधिकरणाकडून तब्बल 43 कोटी रुपयांची विकासगंगा मंजूर करण्यात पनवेल संघर्ष समितीला घवघवीत यश आले आहे. नवीन पनवेल, कळंबोली आणि कामोठ्यातील रस्ते, फुटपाथ आणि पावसाळी गटारांच्या विकास कामांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे.
नवीन पनवेल (पूर्व ) सेक्टर 1 ते 11 आणि पश्चिमेकडील सेक्टर 1 ते 18 मधील अंतर्गत रस्ते, फुटपाथ तसेच पावसाळी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार दुरुस्ती करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडको नवीन पनवेल विभागीय अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांच्यासोबत बैठक घेऊन काही पायाभूत सुविधांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या टप्प्यात नवीन पनवेलसाठी 25 कोटी पन्नास लाख, कामोठे येथील रस्ते, फुटपाथ व गटार दुरुस्तीसाठी 10 कोटी आणि कळंबोलीतील रस्ते, गटारसाठी 8 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनुसार सिडकोचे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, विभागीय अभियंता हनुमान नहाणे, श्री. बडवे, श्री. बाविस्कर आणि गिरीधर घरत आदी अधिकाऱ्यांच्या चमूने विभागीय नागरी सुविधांचा कृती आराखडा तयार केला. त्यांनतर सिडको कोकण भवन प्रशासकीय येथील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशाकीय मंजुरी घेतली आहे.
43.50 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या निविदा काढून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी ग्वाही सिडको अधिकाऱ्यांनी कांतीलाल कडू यांना दिली आहेत.
पनवेल संघर्ष समितीच्या नागरी सुविधांसाठीच्या मोठ्या संघर्षाला यश आले असून उर्वरित शहरांत आणि इतर पायाभूत सुविधा मिळाव्यात याकरिता प्रयत्न सुरु राहतील, अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यात करंजाडेचे सुशोभिकरण!
सिडकोने विकसित केलेल्या शहरांप्रमाणे सध्या करंजाडे शहर कात टाकत असून सिडकोने तिथे सहा बगीचे निर्माण करणार असल्याचे शहर नियोजनात स्पष्ट केले आहे. परंतु सद्यस्थितीला एकही गार्डन नसल्याने विरुंगुळा केंद्र अथवा सुशोभिकरण केलेले नाही. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या गार्डनसोबत रस्ते आणि इतर सुविधा मंजूर करून घेण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने कंबर कसली आहे.