संघर्ष समितीने सपाटा लावून करून घेतली हरिग्राम रस्त्याची दुरुस्ती ! 



 















संघर्ष समितीने सपाटा लावून करून घेतली हरिग्राम रस्त्याची दुरुस्ती ! 




..............................................

पनवेल: रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करताना ठेकेदाराने नियम खुंटीला टांगल्याने अवघ्या चार-पाच महिन्यात रस्त्याला भेगा पडल्या. कामाच्या सुमार दर्जाबाबत पनवेल संघर्ष समितीने सपाटा लावून त्या रस्त्याची दुरुस्ती करून घेतली. रस्ता दुरुस्तीकरणामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

त्याचं असं झालं... रायगड जिल्हा नियोजन समितीने सुशिक्षित बेरोजगार अभियंता योजनेद्वारे अलिबाग-पोयनाड येथील ठेकेदाराला पनवेल तालुक्यातील हरिग्राम गावाच्या रस्त्याच्या काही भागाच्या कॉंक्रिटीकरणाचे तब्बल 17 लाखाचे काम दिले होते. 

त्या ठेकेदाराने ते काम येथील एका स्थानिक ठेकेदाराला करण्यास सांगितले. त्यांनी ते कॉंक्रिटीकरण केलेही. जिल्हा परिषद बांधकाम खात्याने थोडे दुर्लक्ष केले. परिणाम व्हायचा तो झाला. नव्या कोऱ्या रस्त्याला काही दिवसात मोठ्या भेगा पडल्या. काही ठिकाणी रस्ता खचलाही.

याबाबत हरिग्राम गावातील होतकरू आणि जिद्दी तरुणाने निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आवाज उठवला. सत्य परिस्थिती त्याने सर्वांसमोर आणण्यासाठी शंख फुंकले. पंचायत समितीमधील जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे चपला झिजेपर्यंत खेटा मारल्या, पण कुणीही दाद दिली नाही. कारण ठेकेदारही वजनदार होता. मात्र, तरीही तो तरुण मनाने हरला नाही.

त्या तरुणाचे नाव आहे भोळेश्वर म्हात्रे. त्याने काही दिवसांपूर्वी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या कानावर ही कैफियत घातली आणि न्यायाची अपेक्षा केली.

पुढे कडू यांनी त्यांच्या पध्दतीत त्या ठेकेदाराला विनंती केली. अधिकाऱ्यांना समजावून सांगितले. एका मागोमाग एक तारीख मिळू लागली. कडू यांनी थोडा सैलपणे विषय हाताळला. दोन दिवसांपूर्वी जरा अलगद झटका देण्याचा विचार बोलून दाखवताच आज दुपारी ठेकेदाराने हरिग्राम रस्त्याची निमुटपणे डागडुजी केली.

हरिग्राम रस्त्याच्या दुरुस्तीमुळे दुचाकीस्वारांचा अपघाताचा धोका टळला आहे. रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे दुचाकीचे चाक अडकून अपघात होण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागत होते. इतर वाहनांचीही थोड्या फार फरकाने भयानक अवस्था झाली होती. रस्त्याच्या दुरूस्तीनंतर नागरिकांनी पनवेल संघर्ष समिती, कांतीलाल कडू, भोळेश्वर म्हात्रे यांना धन्यवाद दिले आहेत.


 

 



 











Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...