बिबट्याच्या वावरामुळे गावकर्‍यांची उडाली झोप


बिबट्याच्या वावरामुळे गावकर्‍यांची उडाली झोप
महिनाभरापूर्वी रिटघर परिसरातही दर्शन झाल्याच्या वृत्ताला वनखात्याचा दुजोरा
पनवेल/प्रतिनिधी
जंगली श्‍वापदांनी नागरी वस्तीत धुमाकूळ घातल्याच्या  अनेक घटना कानावर पडत असतानाच, पनवेल तालुक्यातील मोहो (शिवकर) येथील ओलसर जागेत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात एका पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटनाही घडली होती. तर बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून वनअधिकार्‍यांनाही त्याला दुजोरा दिला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून मळे करणार्‍या शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री मळ्यात राखण करण्यासाठी मुक्काम ठोकताना धास्ती वाटू लागली आहे.
सगळीकडे होणारी जंगलतोड, पेटवले जाणारे वणवे, डोंगर सपाटीकरण, माती उत्खनन आदी प्रकारच्या घटनांमुळे जंगलातील श्‍वापदांचे जीवन धोक्यात आल्याने त्यांनी आसरा घेण्यासाठी नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. 
त्यातच काही ठिकाणी बिबट्याला उपजिविकेसाठी शिकार न मिळाल्याने त्यांनी मानवी वस्तीवरच हल्ला करून अनेकांच्या नरड्याचा घोट घेतल्याच्या दिसून आले आहे. मानवी वस्तीवर बिबट्याचे होणारे आक्रमण धोकादायक सिद्ध झाल्यानंतर आता मोहो गावाच्या बाहेर असणार्‍या पानथळ जागेवर बिबट्याच्या वावराचे ठसे आढळून आले आहेत. गेल्याच महिन्यात त्याने एका कुत्र्याची शिकार केल्याचे उघड झाले होते. तेव्हापासून नागरिक जीव मुठीत धरून आहेत.


यासंदर्भात वन परिक्षेत्राधिकारी ज्ञानेश्‍वर सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. 
गेल्या महिन्यात रिटघर परिसरात बिबट्या दिसला होता. तोच बिबट्या आता मोहो भागात दिसून येत आहे. 
त्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून त्याच्यावर वन अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तो जंगलात पळून जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी निर्भीड लेखशी बोलताना सांगितले.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...