वाहतूक पोलिसांचा कार्यालयीन संसार खुराड्यातून शहरात स्थलांतरित करा!



वाहतूक पोलिसांचा कार्यालयीन संसार खुराड्यातून शहरात स्थलांतरित करा!
................................................
नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पनवेल संघर्ष समितीचे साकडे
..................................................
पनवेल: पनवेल शहारासाठी पोलिसांचे आसूडगाव बस डेपो समोर असलेले गैरसोयीचे आणि खुराड्यातील कार्यालय पनवाहतूकवेल शहरात हलविण्यात यावे, अशा मागणीच्या आशयाचे पत्र नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना पनवेल संघर्ष समितीने पाठवले आहे.
पनवेल वाहतूक शाखेचा 1983 पासून आसूडगाव बस डेपो समोर छोट्याशा खुराड्यातून कारभार सुरू आहे. पनवेल आणि नवीन पनवेल शहर, राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा आणि पळस्पे फाटा असा विस्तारित भाग त्यांच्या नियंत्रणाखाली येत आहे. या परिसरात कुठेही वाहनांवर कारवाई केली की, ती वाहने रात्री कार्यालयाच्या अपुऱ्या जागेत दाटीवाटीने ठेवण्यात येतात. त्यामुळे छोट्या वाहनांचे मोठे नुकसान होते. विशेषतः महिला दुचाकीस्वरांना कार्यालय शोधून काढण्यात अत्यंत क्लिष्ट ठरते. पनवेलची उत्क्रांती होत असताना वाहतूक खात्याचा प्रशासकीय कारभार प्रशस्त इमारतीमधून चालावा, या करिता संघर्ष समितीने संजय कुमार यांना काही पर्याय सुचवले आहेत.
पनवेल ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मालकीचा त्यांच्या कार्यालयाशेजारी पनवेल शहरात मोठा भूखंड आहे. त्यावर ग्रामीण पोलिस ठाणे, परिमंडळ-2 पोलिस उपायुक्तांचे कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय, पोलिसांसाठीचे मंथन सभागृह, वाहतूक पोलिस आयुक्तांचे बंद स्थितीतील कार्यालय आणि राखीव दलाच्या तुकडीसाठी काही खोल्या आहेत. त्याशिवाय भले मोठे मैदान आहे. मैदान आणि कार्यालयांव्यतिरिक्त मोकळी जागा आहे. तिथे पनवेल महापालिकेकडून वाहतूक खात्याच्या प्रशस्त कार्यालयाची इमारत बांधून घेण्यासाठी पत्रव्यवहार करावा, अशी विशेष मागणी संजयकुमार यांच्याकडे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.
याशिवाय सिडकोच्या भूखंडावर कार्यालयाची इमारत बांधायची झाल्यास सिडकोकडून भूखंड आणि इमारत बांधून घेताना ठाणे नाक्यावरील सिमरन मोटर्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडाचा विचार करावा, असे सूचित केले आहे. याशिवाय तूर्तास वाहतूक खात्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप असल्याने तात्पुरता कारभार त्या कार्यालयातून चालवून पनवेलकरांना आणि वाहतूक पोलिसांना सन्मानपूर्वक दिलासा मिळेल, असा दावा कडू यांनी केला आहे.

महापालिका आणि सिडकोचे दुर्लक्ष!
..............................................
पनवेल महापालिका आणि सिडको ही दोन्ही राज्य शासनाची प्राधिकरणे वाहतूक खाते आणि नागरिकांना सहकार्य करण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. वाहतूक कोंडीमुळे महापालिका आणि सिडकोची अनेकदा नामुष्की होत असताना त्यांनी वाहतूक खात्याच्या किमान गरजा पुरवणे गरजेचे आहे. दोन्ही आस्थापनांच्या विविध प्रकल्पामुळे वाहतूक खात्याची घडी बिघडत आहे. त्यामुळे त्यांना वाहतूक खात्याचे एकतर्फी सहकार्य हवे असते. महापालिका आणि सिडकोने वाहतूक खात्याच्या प्रशासकीय इमारतीसाठी जागेचा आणि इमारतीचा प्रश्न मार्गी लावणे लोकहिताचे ठरेल, असा दावा कांतीलाल कडू यांनी केला आहे.      
 

 


 



 

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...