आतड्यांचे आरोग्य सांभाळा!
हिवाळा सर्वांसाठी आनंददायी असला, तरी हा हिवाळा अनेक पोटांच्या तक्रारींना आमंत्रण देतो. जंक फूडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, बैठे काम अशा बदललेल्या जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येते. आतड्यांमध्ये अन्नाचे व्यवस्थित पचन व्हायला हवे, तरच आरोग्य चांगले राहू शकेल. पचन संस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे आतडे आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहिले, तर शरीर सुरळीतपणे कार्य करू शकते.
मानसिक ताणतणाव हा आतड्यांवरही दुष्परिणाम करतो. मानसिक तणाव, चिंता, दु:ख यामुळे आतड्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो. अपुरी झोप, अति उष्णता, थंडी, मोठमोठ्या आवाजांपासून दूर राहा. ताजी फळे, भाज्या तसेच संतुलित आहाराचे सेवन करा. व्यायाम, मानसिक शांतीकरिता ध्यान, श्वासाचे व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
* साखरेचे सेवन कमी करा:
साखर आणि कृत्रिम स्विर्ट्सनी भरलेल्या आहारामुळे पोटांच्या तक्रारी उद्भवू शकतात. साखर आणि चरबीयुक्त आहारामुळे आतड्यांवर वाईट परिणाम होतात. यामुळे व्यक्तीला मधुमेह आणि -हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. हे पदार्थ एखाद्याच्या साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतात. साखर खाणे बंद केल्यास पोट आणि आतडे यांना चांगल्याप्रकारे अन्न पचण्यास मदत होते.
* प्रोबायोटिक्सचे सेवन:
प्रोबायोटिक्स हे मायक्रोऑरगॅनिझम्स असतात. यात साधारणपणे बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू काही विशिष्ट प्रकारचे यीस्टस् असतात. याच्या सेवनाने अनेक प्रकारचे लाभ होतात. जीवाणूंच्या विशिष्ट प्रक्रियेतून तयार केलेल्या दही किंवा योगर्ट यासारख्या पदार्थांमधून प्रोबायोटिक्स मिळतात. प्रोबायोटिक सप्लिमेंटस् आणि आंबवलेल्या भाज्या असे पदार्थही प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत असतात. चांगले किंवा उपकारक जीवाणू म्हणून ओळखले जाणारे प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या आणि वाईट विषाणूंमध्ये संतुलन ठेवतात.
* पुरेशी झोप घ्या:
पुरेशी झोप न घेतल्यानेसुद्धा पोटाच्या समस्या होतात. कमीत कमी 8 तास झोप घेणे अतिशय गरजेचे आहे. अनियमित झोपेच्या वेळांमुळेदेखील आतड्यांमधील दाह वाढून पोटाच्या समस्या निर्माण होतात.