बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज
ऑस्ट्रेेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्राचे प्रतिपादन
नवी दिल्ली/वृत्तसंस्था
ऑस्ट्रेेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्रा हा त्याच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. क्रिकेटच्या इतिहासातील तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता असे म्हटले तरीही कोणी हरकत घेणार नाही. मॅकग्रा अनेक नवोदित गोलंदाजांचा आदर्श आहे.
तसेच सध्याच्या क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू मॅकग्राकडून प्रेरणा घेऊन गोलंदाजी शिकले आहेत.
सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अनेक दमदार आणि प्रतिभावंत गोलंदाज आहेत. त्यापैकी सर्वोत्तम तीन गोलंदाजांची नावे मॅकग्राने सांगितली आहेत.
ग्लेन मॅकग्राचा ८ फेब्रुवारीला ५० वा वाढदिवस झाला. त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत त्याला सध्याच्या क्रिकेटमधील तीन सर्वोत्तम गोलंदाज कोण असा प्रश्न विचारण्यात आला.
हजरजबाबी असलेल्या मॅकग्राने या प्रश्नाचे अतिशय विनोदी पद्धतीने उत्तर दिले. त्याने सध्याच्या क्रिकेटमधील भारतीय संघाचा एक गोलंदाज, दक्षिण आफ्रिकेचा एक गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाज सर्वोत्तम असल्याचे सांगितले. पण त्याचसोबत न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाचे नावही त्याने प्रतिभावंत गोलंदाजांमध्ये घेतले.
मॅकग्राला प्रश्न विचारला तेव्हा सर्वप्रथम त्याने मजेशीर उत्तर दिले.
सगळे ऑस्ट्रेलियन गोलंदाज हे सर्वोत्तम आहेत. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क सारेच सर्वोत्तम आहेत, असे विनोदी उत्तर त्याने दिले आणि तो स्वत:च हसला.
त्यानंतर बोलताना तो म्हणाला, खरं सांगायचं तर पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह आणि कगिसो रबाडा हे सध्याच्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. मला नील वॅग्नरदेखील प्रतिभावंत गोलंदाज वाटतो.