ताम्हणी घाटातील अपघातात तिघे ठार
दिवेआगारला जाताना कार झाडावर आदळली; दोन जखमी
माणगाव/प्रतिनिधी
पुणे येथील आळंदी रोडजवळील राहणारे 5 तरुण आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कोकणातील दिवेआगार येथे निघालेल्या एर्टिगा कारला ताम्हणी घाटातील अवघड वळणावरील झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले.
आज, गुरूवारी (ता. 20) पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघाताची माहिती माणगाव पोलिस ठाण्याला समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगावले व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले. यापैकी एका तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ पुणे येथील नवले रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर ताम्हणी घाटात विजय गोरख पाटील याने जखमी अवस्थेत कारमधून बाहेर पडून रस्त्यावर मदतीसाठी टाहो फोडला होता. त्यावेळी अंधार व घाट रस्ता असल्याने कुठलेही वाहन चालक मदतीसाठी थांबले नाही. थोड्या वेळाने त्याने स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून 100 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
अपघाताबाबत माणगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, पुणे-आळंदी रोड येथील पाच तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे कोकणात एर्टिगा कारने निघाले होते. 3 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील ताम्हणी घाटातील कोंडेथर घाटातील अवघड उतार वळणावर कार आली असता, कार चालक निखिल चंद्रकांत घुले (वय 26, रा. बोपखेल, गणेश नगर, मातोश्री निवास, कॉलनी नं. 11, आळंदी रोड पुणे) या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यालगत असणार्या झाडावर जोरात आदळली. कार चालक निखिल घुले (वय 26), चंद्रकांत निकम (वय 28, रा. बोपखेल,गणेश नगर, रोड नं. 19, आळंदी रोड पुणे), विक्रमसिंग (वय 31, रा. बोपखेल, गणेश नगर कॉलनी नं. 14, आळंदी रोड पुणे) हे तीन तरुण जागीच ठार झाले. तर त्यांचे सहाकारी विजय गोरख पाटील (वय 28, रा. बोपखेल, गायत्री निवास, कॉलनी नं. 20 गणेश नगर, आळंदी रोड पुणे) तसेच सुनील बालाजी तेलंगे (वय 27, रा. बोपखेल गणेश नगर कॉलनी नं. 09, आळंदी रोड, पुणे) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले. जखमी पैंकी सुनील तेलंगे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातून पुणे येथील नवले रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. तर विजय गोरख पाटील यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मयत तरुणांपैकी विक्रम सिंग हा आखाती देशात नोकरीला होता. तो सुट्टीकरिता आपल्या गावी पुणे येथील आला होता. तोही आपल्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा करण्याकरिता जात असताना त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामदास इंगवले हे तपास करीत आहेत.