चौघांच्या मृतदेहांचा सडा
तिघांची गळा आवळून हत्या केल्यानंतर कुटूंबप्रमुखाची आत्महत्या
तळोजे/प्रतिनिधी
‘आम्ही कंटाळून आत्महत्या करीत आहोत. कुणालाही दोषी ठरवू नये. आमचे कुणीही नातेवाईक नाहीत, त्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नये. हिंदू आहोत, त्यामुळे त्याच रितीरिवाजाने अंत्यसंस्कार करावेत’, अशा भावनिक शब्दात चिठ्ठी लिहून एका कुटूंबाने जीवनाचा शेवट केला. ही घटना खरे तर दिड दोन महिन्यांपूर्वी घडली असावी. आज, त्या चौघांचे मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले. तळोजे पोलिसांनी कुटूंबप्रमुखाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
भाडेतत्वावर तळोजा फेज 1 येथील सेक्टर 9 मधील शिव कॉर्नर सोसायटीत भाडेतत्वावर राहणार्या उपाध्याय कुटुंबियांचे चौघांचे मृतदेह शनिवारी सकाळी बेडरुममध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डी-विंगमधील पाचव्या मजल्यावरील 502 हा ब्लॉक राजेश भारद्वाज यांच्या मालकीचा ब्लॉक आहे. त्यांनी तो आठ महिन्यांपूर्वी नितीश कुमार उपाध्याय यांनी भाड्याने घेतला होता. उपाध्याय हे नियमित 5 ते 6 तारखेला भाडे देत असत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ब्लॉकचे भाडे त्यांना मिळाले नाही. तसेच त्यांनी केलेला मोबाईल फोन सुद्धा नितीश कुमार यांनी उचलला नाही. त्यामुळे आज शनिवारी सकाळी भारद्वाज सोसायटीत आले होते. त्यांनी सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांना घेवून त्यांच्या ब्लॉकवर गेले. ब्लॉक हा आतून बंद आढळून आल्याने भारद्वाज यांच्याकडे असलेल्या दुसर्या चावीने उघडण्यात आला. त्यांना बेडरुमचा दरवाजा बंद आढळला. तो उघडला असता त्यांना कुबट वास आला. समोर नितीश कुमार उपाध्याय (35) यांचे मुंडके पंख्याला लटकताना आढळले तर त्यांचा देह खाली पडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता. तशाच प्रकारे नायलॉन दोरी व इतर कपड्यांच्या सहाय्याने एका अंदाजे 30 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व तीच्या बाजूला सात वर्षीय मुलगाव आठ वर्षीय मुलीचा मृतदेह सुद्धा अशाच पद्धतीने कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तात्काळ त्यांनी याबाबतची माहिती तळोजा पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच तळोजा पोलिस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी याबाबतची माहिती परिमंडळ 2 चे उपायुक्त अशोक दुधे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना दिली. तातडीने हे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्यांचा तपास सुरू केला.
प्राथमिक माहितीमध्ये उपाध्याय याने प्रथम तिघांना जीवे ठार मारुन त्यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. घर मालकाचे दोन महिन्यांचे थकीत भाडे 16 हजार रुपये सुद्धा तेथे ठेवल्याचे समजते. या संदर्भात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्येपूर्वी कागदपत्रांना दिला अग्नी!
नितीश कुमार उपाध्याय याचा ऑन लाईन ट्रेडिंगच्या व्यवसाय होता, अशी माहिती पुढे येत आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी ओळख दर्शवणारे सारे पुरावे जाळून नष्ट केल्याची महिती सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी दै. निर्भीड लेखशी बोलताना दिली. उपाध्यय कुठले, ते इथे कसे आले, त्यांचे नातेवाईक कोण आणि त्यांनी हे कृत्य का केले असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरत आहेत.