भविष्यात यंत्रे आपल्यावर सत्ता गाजवणार का?


भविष्यात यंत्रे आपल्यावर सत्ता गाजवणार का?
माणसाने आतापर्यंत यंत्रांवर आणि यंत्रांच्या आधारे इतरांवर सत्ता गाजवली; परंतु भविष्यात यंत्रे आपल्यावर सत्ता गाजवणार का? हा केवळ काल्पनिक प्रश्‍न नाही. ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान विकसित होत आहे, ते पाहता आगामी काही वर्षांत असे होऊ शकते. आपल्या सुपर इंटेलिजन्सच्या जोरावर यंत्रे आपल्यावर अधिराज्य गाजवू शकतात. या सुपर इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे उद्भवू शकणार्‍या परिस्थितीचा कानोसा आपण आधीच घ्यायला हवा.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास वेगाने होत असून, जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये तिचा प्रभाव वाढत आहे. आता सुपर इंटेलिजन्स तंत्रज्ञानही विकसित होऊ लागले आहे. येणारा भविष्यकाळ याच तंत्रज्ञानाचा असेल, असे मानले जाते; परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार्या काळात मानवी बुद्धिमत्तेवरही मात करू शकेल, हे तुम्ही ऐकले आहे का? होय, सन 2050 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता एवढी ताकद निर्माण करेल, की विचार करणे आणि समजून घेणे या बाबतीत ती मानवी बुद्धिमत्तेलाही मागे टाकेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आजच कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरलेली यंत्रे मानवी मेंदूशी पंगा घेऊ लागली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सातत्याने सुधारणा आणि विकास होत आहे. लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सर्वाधिक विकसित रूप समोर येईल. आत्यंतिक गतिमान प्रोसेसरची जोड लाभून त्याचे रूपांतर सुपर इंटेलिजन्समध्ये होईल. 
ही प्रगती स्पृहणीय असणार आहे, हे नक्की; पण जेव्हा असे होईल तेव्हा नेमके काय घडेल, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. शास्त्रज्ञांचे मत असे आहे की, 2050 मध्ये यंत्रे मानवी बुद्धिमत्तेशी बरोबरी करू लागतील. असे झाले तर यंत्रे आपले आदेश मानतील का, हा प्रश्‍न स्वाभाविकपणेच उपस्थित होतो आणि होणारच! या प्रश्‍नाचे उत्तर देणे शास्त्रज्ञांनी आतापर्यंत टाळले आहे. अर्थात, आजवरचा मानवी इतिहास असे सांगतो की, आपले प्रभुत्व कायम राखण्याचा मार्ग प्रत्येक टप्प्यात मानव शोधून काढतोच; परंतु आतापर्यंत मानव आणि यंत्रांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष झालेला नाही आणि म्हणूनच तसा संघर्ष झाल्यास वास्तवात त्याचा अर्थ कसा निघेल, त्या संघर्षाचे स्वरूप काय असेल, याचा अंदाज आताच बांधणे घाईचे ठरेल. 
थोडक्यात सांगायचे झाल्यास, यांत्रिक बुद्धिमत्तेची मानवाला भीती वाटत आहे. एवढेच नव्हे, तर यांत्रिक बुद्धिमत्तेमुळे अशा एका प्रलयाची नांदी ऐकू येत आहे, जो इतिहासात कधीच झाला नाही.
यंत्रांनी आतापर्यंत मानवाची शारीरिक शक्ती, गती, सामर्थ्य आणि ताकद या गोष्टींना मागे टाकले आहे. त्यामुळे विचारशक्ती, निर्णयशक्ती आणि मेंदूच्या ताकदीच्या बाबतीत जेव्हा यंत्रे मानवाला मागे टाकतील, तेव्हा काय घडेल याचा विचार करणे अवघड बनले आहे. यंत्रे अधिक बुद्धिमान, सक्षम, समर्थ आणि दमदार असतील तर आपल्यापेक्षा दुय्यम क्षमता असलेल्या माणसाच्या काबूत ती राहतील का? अशी यंत्रे बेकाबू झाली, तर त्याचा परिणाम काय होईल? 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...