विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; रस्ता चुकल्याने मदतीच्या बहाण्याने केला घात
मूळच्या नाशिक येथील १९ वर्षीय नवविवाहितेसोबत हा प्रकार घडला आहे. नातेवाइकांसोबत रेल्वेने प्रवास करत असताना १९ फेब्रुवारीला कुर्ला स्थानकात तिची नातेवाइकांसोबत ताटातूट झाली. ती प्रथम घाटकोपर, मुंब्रा स्थानकात मदतीचे आवाहन करत फिरत होती. यावेळी एका रिक्षाचालकाला तिने संपूर्ण प्रकार सांगून मदत मागितली.
सदर महिला अडचणीत असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिला महापेतील बंद बसडेपोत नेऊन ठार मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला. या धक्क्यातून स्वत:ला सावरत ही महिला पुन्हा मदतीसाठी रस्त्यालगत उभी होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना तिने घडलेल्या कृत्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी तिला घणसोली स्थानकात सोडण्याच्या बहाण्याने स्थानकापासून काही अंतरावरील अडचणीच्या ठिकाणी नेऊन दोघांनीही तिच्यावर अत्याचार करून पळ काढला.
वेगाने तपास सुरु
यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी निरीक्षक अनिल पाटील, सहायक निरीक्षक यशवंत पाटील, उपनिरीक्षक शरद आव्हाड, किरण पाटील आदींचे पथक तयार केले होते.