सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा
खालापूर/प्रतिनिधी
शनिवार रविवारच्या सुट्ट्यांना जोडून आलेली महाशिवरात्रीची सुट्टी यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनातून घराबाहेर पडल्याने मुंबईपुणे एक्सप्रेस वेवर भल्या पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागेल आहेत. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेस वेचा वेग सकाळपासून मंदावला आहे.
खालापूर टोल नाक्यावर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्याने फास्ट टॅगपासून सर्वच यंत्रणा कोलमडली आहे. टोल भरण्याकरिता वाहनांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे खंडाळा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर फुडमॉल ते खंडाळा दरम्यान मुंगीच्या संथ गतीने वाहने पुढे सरकत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वेग कमी झालेला असताना घाटाचा अवघड टप्पा चढताना काही ठिकाणी अवजड वाहने बंद पडणे, गरम होणे असे प्रकार होत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहेत.
तीन दिवस सलग सुट्ट्या मिळाल्याने अनेकांनी लोणावळ्यासह कोल्हापुर, महाबळेश्वर, भिमाशंकर, शिर्डी, पंढरपुर आदी पर्यटनस्थळी तसेच देव दर्शनाचा बेत आखत घराबाहेर पडणे पसंत केले. सकाळी सकाळी वाहतुक कोंडी टाळण्याकरिता सर्वच बाहेर पडल्याने सकाळीच घाट परिसरात वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. बोर घाट पोलिस व खंडाळा टॅप पोलिस वाहतुक सुरळीत ठेवण्याकरिता प्रयत्न करत असले तरी ते वाहनांच्या संख्येपुढे कुचकामी ठरत आहेत.