धनंजय मुंडेंमधला बाप जागा झाला!
रेल्वे ट्रॅकजवळ सोडून दिलेल्या मुलीचं स्वीकारलं पालकत्व
शिक्षणापासून लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी मुंडेंनी स्वीकारली
महाराष्ट्रासह देशभरात आजही अनेक भागांमध्ये स्त्री-भ्रुण हत्येसारखे प्रकार सुरु आहेत. या गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्यात आणि केंद्र सरकारने अनेक कठोर कायदे केले आहेत, मात्र तरीही अनेकदा मुलीला कचऱ्याच्या पेटीजवळ किंवा निर्जन ठिकाणी एकटं सोडून आई-बाप निघून गेल्याचे प्रकार समोर येतात. अनेकदा जागरुक नागरिकांमुळे अशा नकोशा मुलींचे प्राण वाचतात, तर काहीवेळा त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागतं.
मात्र महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. रेल्वे-ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात मुलीला सोडून कोणीतरी पळ काढला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट समजताच…त्यांनी तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखलं केलं. इतकच नव्हे तर धनंजय मुंडेंनी या मुलीचं पालकत्व स्वीकारलं असून तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्विकारली आहे. धनंजय मुंडेंनी या मुलीचं नाव शिवकन्या असं ठेवलं आहे.
धनंजय मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी या मुलीच्या उपचाराची सर्व सोय केली असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं कौतुक होताना दिसत आहे.