संघर्ष समितीच्या प्रयत्नांमुळे एमआयडीसीनेही महापालिकेला वाढवून दिले पिण्याचे पाणी


.................................................
वीस लाख लीटर पाणी वाढले; आधी एमजेपीकडून वाढवून घेतले तीस लाख लिटर
..................................................
पनवेल: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत संघर्ष समितीने घेतलेल्या बैठकीचे फलित म्हणून पनवेल महापालिकेला दोन एमएलडी अर्थात वीस लाख लीटर पाणी दररोज वाढवून देण्यात आले आहे. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता पी. के. भारती यांनी कडू यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीचे अधीक्षक अभियंता पी. के. भारती आणि विभागीय अभियंता के. राजू यांची भेट घेतली होती. पनवेल महापालिकेला पाणी टंचाई भेडसावत असल्याने ज्यादा पाणी मिळावे याकरिता पनवेल संघर्ष समितीने भारती यांना साकडे घातले होते. तत्पूर्वी रानसई विभागाचे तुर्भे, नवी मुंबई येथील विभागीय अधीक्षक अभियंता मारुती कलकुट्टीकी आणि विभागीय अभियंता पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन्ही विभागाशी समन्वय साधून दररोज पाठपुरावा केल्याने अखेर संघर्ष समितीच्या मागणीला यश आले असून दोन दशलक्ष घनलीटर पाणी पनवेल महापालिकेला वाढवून देण्यात आले आहे.
महापालिकेला एमआयडीसीकडून विविध भागात पंधरा दशलक्ष घनलीटर पाणी देण्यात येत होतं. एमआयडीसीने तक्का परिसर, श्री दत्त हॉटेल, धाकटा खांदा, मोठा खांदा, नावडे आदी परिसरात जोडण्या दिलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाणी वाढवून देताना त्याचे नियोजन करण्याची रंगीत तालीम सुरू होती. याकामी अधीक्षक अभियंता पी. के. भारती, मारुती कलकुट्टीकी, पवार आदींनी अतिशय मेहनत घेतली.
एमआयडीसी पनवेल महापालिकेला आता सतरा दशलक्ष घनलिटर तर उर्वरित गावे आणि औद्योगिक वसाहतींना 18 दशलक्ष घनलिटर पाणी पुरवत आहे. संघर्ष समितीच्या लढ्यामुळे पनवेलकरांची काही अंशी तहान भागण्यास मदत होऊ शकेल.

संघर्षने यापूर्वी एमजेपीकडून वाढवून
आणले तीस लाख लिटर पाणी !
...........................................
पनवेल शहराला पाणी टंचाई भेडसावत असताना अभ्यासपूर्ण ताकदीने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी मोठ्या व्यासाची जोडणी देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना राजी करून गेल्या दोन महिन्यांपूर्वी तीस लाख लिटर पाणी वाढवून घेतले आहे. नवीन पनवेल येथील पोदी भागात जुनी जोडणी रद्द करून मोठ्या व्यासाची जोडणी देण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. एमजेपीचे अधीक्षक अभियंता सी. आर. सूर्यवंशी, विभागीय अभियंता अर्जुन गोळे, प्रशांत पांढरपट्टे आदींनी याकामी मेहनत घेतली होती.
ते तीस लाख आणि एमआयडीसीचे वीस लाख लिटर वाढीव पाणी पनवेल महापालिकेला आणून देण्यात पनवेल संघर्ष समितीने बाजी मारली आहे.

लढा अजून संपलेला नाही!
...................................
एमआयडीसी आणि एमजेपी अधिकाऱ्यांनी पनवेल महापालिकेला पाणी वाढवून देताना संघर्ष समितीने व्यक्त केलेल्या सामाजिक भावनांचा आदर केला आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद. मात्र, जो पर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शहरे आणि गाव परिसरातील नागरिकांची पाण्याची पूर्ण मागणी पूर्ण होत नाही. नागरिकांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत शासनासोबत पाण्यासाठीचा लढा सुरूच राहिल.
- कांतीलाल कडू
अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...