आगसत्र संपेचि ना!


आगसत्र संपेचि ना!
आरके स्टुडिओ, कमला मिल, एमटीएनएल इमारत, बांद्रा रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टी, सीवूड टॉवर, मुंबई जीएसटी भवनसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या आसपासच्या अशा अनेक इमारती तिला लागलेल्या आगीमुळे कायमस्वरूपी चर्चेत आणि लक्षात राहिल्या आहेत. त्यातच गत काही वर्षात भिवंडी, डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना लागलेल्या भीषण आगीने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मुंबईतील जीएसटी भवनला सोमवारी लागलेल्या आगीनंतर डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील फेज-२ मधील ‘मेट्रोपॉलिटिन एक्सिम लिमिटेड’ या रसायन कंपनीला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली.
कंपनीत असलेले रसायन साठवून ठेवलेले शेकडो ड्रम या आगीच्या भक्षस्थानी सापडले. आगीचे हे एकूणच सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात नेरुळ येथील सीवूड ४४ सेक्टरमधील एका दुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरील दोन फ्लॅटस्ना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत असताना अपु-या यंत्रणेमुळे अग्निशमन दलाचे दोन अधिकारी आणि पाच कर्मचारी भाजून निघाले. गंभीररीत्या भाजलेल्या या कर्मचार्‍यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. डोंबिवलीतील मंगळवारी एका कारखान्याला लागलेली आग सायंकाळी उशिरापर्यंत आटोक्यात आली नव्हती.
२०२०च्या पहिल्याच दोन महिन्यांत मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई अशा विविध ठिकाणी गजबजलेल्या परिसरातील निवासी, अनिवासी, व्यावसायिक इमारतींना आगी लागण्याचे तसेच औद्योगिक वसाहतीत मानवी चुकांमुळे आग लागण्याचे प्रकार वाढतानाच दिसत आहेत. याशिवाय आगीमुळे पर्यावरणाची आणि वनसंपदेची हानी होण्याचे प्रकारही मोठया प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. 
राज्यात गेल्या ५ वर्षामध्ये आगीच्या १ हजार ११० घटना घडल्या आहेत. त्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ हजार ५३३ हेक्टर जंगलाची जमीन जळून खाक झाल्याची माहिती, माहिती अधिकारातून उघड झाली आहे. गेल्या ५ वर्षामध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे ९० कोटींच्या वनसंपदेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वॉचडॉग समूहाने २०१५ ते २०१९ या कालावधीत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी लागलेल्या जंगलातील आगींबाबत माहिती मागवली होती. माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देताना मुंबईत सर्वाधिक आग ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लागल्याचे समोर आले, तर जंगलात लागलेल्या आगींपैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आग ही केवळ कृषी आणि जमीन अधिग्रहणासाठी लावण्यात आली होती.
वन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१८ या कालावधीत आगीच्या घटनांमध्ये ११९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मुंबईनंतर सर्वाधिक ५२५ आगीच्या घटना नाशिकमध्ये घडल्या. नाशिकमध्ये जंगलात लागलेल्या आगीमुळे ४ हजार ९१७ हेक्टर जमीन जळून खाक झाली होती. तसेच या ठिकाणी लागलेल्या आगीत ५३.४८ कोटी रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल अहमद यांनी २००८ पासून जुलै २०१८ पर्यंत मुंबईत लागलेल्या आगीची माहिती मागितली होती. 
त्यानुसार अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे २००८ ते जुलै२०१८ पर्यंत मुंबईत ४८ हजार ४३४ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात १ हजार ५६८ आगीच्या घटना या गगनचुंबी इमारतीतील असून ८ हजार ७३७ आगी या रहिवासी इमारतींना लागलेल्या असल्याची माहिती दिली आहे. यात ३ हजार ८३३ व्यावसायिक इमारतींना आग लागल्याच्या घटना आहेत, तर ३ हजार १५१ घटना या झोपडपट्टींमधील आगीच्या आहेत. मागील १० वर्षात लागलेल्या आगीसाठी शॉर्टसर्किट हे आगीचे महत्त्वाचे कारण असल्याचीही बाब यातून समोर आली आहे. कारण ४८ हजार ४३४ घटनांपैकी तब्बल ३२ हजार ५१६ आगीच्या घटना या शॉर्टसर्किटमुळे लागल्या आहेत. त्याचवेळी ११ हजार ८८९ घटना या गॅस सिलिंडर लिकेजमुळे झालेल्या आहेत. या आगीच्या दुर्घटनांमध्ये ६०९ लोकांचा मृत्यू झाला असून यात २१२ पुरुष, तर २१२ स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत ८९,०४,८६,१०२ रुपये इतके आर्थिक नुकसान झाले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून विकसित होत असलेल्या मुंबईसारख्या शहरात आगीच्या घटनांत दर महिन्याला वाढच होत असून २०१८ पर्यंतच्या घटनांपेक्षाही २०१८ ते २०२० अखेरच्या घटनांमधील मालमत्ता हानी अधिक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी मात्र महापालिका प्रशासन असो वा अग्निशमन दल वा राज्य सरकार कुणाकडूनच ठोस पावले उचलली जात नाहीत. इतक्या गंभीर घटना घडूनही अद्यापही अग्निशमन दलाकडून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवरक्षक अधिनियम २००६ची अंमलबजावणी का करण्यात येत नाही हा प्रश्‍नच आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...