सरसगडाचे अस्तित्व धोक्यात
पुरातन विभागाचे दुर्लक्ष; वणव्याची गड-किल्ल्याला झळ; वृक्षसंपत्तीही नष्ट
पाली/प्रतिनिधी
प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले पाली हे गाव सरसगडाच्या कुशीत वसले आहे. जणू काही अनादी काळापासून सरसगड या पल्लीपुराच्या (पाली) रक्षणासाठीच उभा आहे की, काय असे वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे महत्व ओळखून गडास स्वराज्यात दाखल करुन घेतले आणि सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होण मंजूर केल्या होत्या. त्यानुसार दुर्गमता व विपूल जलसंचय यावर विशेष भर देवून गडाची बांधणी करण्यात आली. दुरवर टेहाळणी करण्यास व इशारा देण्यास सरस म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले. मात्र पुरातन विभागाचे किल्ल्याकडे दुर्लक्ष आहे. किल्ल्यारील अनेक बुरुज ढासळले असून पायर्या तुटल्या आहेत. तळ्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच वारंवार लागणार्या वणव्यांमुळे येथील वृक्ष संपत्ती संपुष्टात आली आहे. त्यामुळे पशु-पक्षांची निवासस्थाने नष्ट झाली असून त्यांची दाण्या-पाण्यासाठी देखील वणवण होत आहे.
समाधानकारक बाब म्हणजे मागील वर्षी सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे किल्ल्याच्या दोन्ही बाजूला भव्य दरवाजे बसविण्यात आले आहेत. तसेच काही गडसंवर्धन संस्था येथे संवर्धनाचे काम करत आहेत. मात्र तरीही येथे आणखी काम होण्याची आवश्यकता आहे.
पालीतून किल्ल्यावर पोहचायला साधारण एक तास लागतो. अग्निजन्य खडकापासून बनलेल्या या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासुन 490 मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूकडील 111 पायर्या सलग एकाच दगडात घडविलेल्या असून उंच व प्रशस्त आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूकडून वाटा आहेत. चुना व घडीव दगडांचा उपयोग करुन किल्ल्याला बुरुज व तटबंदी करण्यात आली आहे. या दोन्ही बाजुला किल्ल्यावर येण्यासाठी प्रवेशद्वार कोरलेले आहेत.
दक्षिणेकडील दरवाजा ‘दिंडी दरवाजा’ म्हणून ओळखला जातो. उत्तरेकडून किल्ला चढून गेल्यावर प्रवेशद्वाराजवळ मोती हौद आहे. या हौदातील पाणी अतिशय थंड व स्वच्छ असून ते बारामही उपलब्ध असते. या हौदाची खोली तीन मीटर आहे. अशा प्रकारचे दहा मोठे हौद बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी खोदलेले आहेत. किल्ल्यावर घोड्याची पागा, धान्य कोठारे, शस्त्रागारे, कैदखाने, दारू कोठारे व देवळ्या खोदून बांधण्यात आली आहेत.
बैठकीच्या खोल्या बांधण्यात आल्या असून यामध्ये शिबंदी राहत असे. तोफा व बंदूकांचा वापर करण्यासाठी बुरुज व तटास अनेक छिद्रे (जंग्या) ठेवण्यात आली आहेत. किल्ल्याला दक्षिणोत्तर जाणारे भुयार बालेकिल्ल्याच्या खालील बाजूस खोदलेले आहे.
बालेकिल्ल्यावर जागेचे क्षेत्रफळ अर्धा हेक्टर आहे. या जागेत जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिर व त्याभोवती तळे आहे. तसेच शहापिर दर्गा आहे. वैशाख पोर्णिमेला दर्ग्याचा उरुस भरतो तर श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला केदारेश्वराच्या दर्शनासाठी किल्ल्यावर भाविकांची गर्दी असते. सरसगड किल्ल्याचाच भाग असलेला सलग दगडांचा एक जुळा किल्ला पाठिमागे उभा आहे. या भागास तीन कावडी असे म्हणतात.
येथील शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानचे पदाधिकारी ऋषी झा यांनी सांगितले की, विविध दुर्ग संवर्धन संस्था व संघटनांकडून मागील काही वर्षांमध्ये गड स्वच्छतेची कामे सुरु आहेत तसेच वृक्षारोपण देखील केले जात आहे. मात्र, पुरातन विभागाची उदासिनता व नियम यामुळे किल्ल्याची डागडुजी करता येत नाही. केवळ साफसफाई व वृक्षारोपणच करण्यात येते. अशा या ऐतिहासिक महत्व असलेल्या ठेव्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात दिसते मनोहारी दृश्य
पावसाळ्यात किल्यावर मोठ्या प्रमाणात ढग येतात. त्यामुळे सरसगड जणु ढगांच्या कुशीत लपलाय असे वाटते. तसेच किल्ल्यावरुन पांढरे फेसाळणारे आकर्षक धबधबे खाली कोसळताना दिसतात. जणू काही किल्ल्याने पांढरी मफलर ओढली आहे असे वाटते. तसेच किल्ल्यावर सगळीकडे हिरवे गवत वाढते त्यामुळे किल्ल्याने हिरवी शालच ओढली आहे की, काय असे वाटते हे मनोहारी दृष्य सगळ्यांचेच लक्ष वेधते.
वणव्यांमुळे वनसंपदा ‘नष्ट’
सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या तळई व घेरा सुधागड गावासमोरील किल्ल्याचे बुरुज ढासळले आहेत. तसेच किल्ल्याच्या चारही बाजूने वणवे लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे येथे राहणार्या पशू-पक्षांची अन्न-पाण्यासाठी खुप वाताहत होत आहे. येथे राहणारे मोर, माकड व भेकर हे प्राणी अन्नपाण्यासाठी गावात येत आहेत. माकडे तर सर्रास गावात हिंडत असतात. वणव्यांमूळे तटबंदी, बुरुज आदी बांधकाम देखिल ढिले झाले आहे. काही वेळेस दगड खाली घरंघळत येतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडखाणीतील स्फोटांमुळे किल्ल्याला हादरे बसून तो कमकुवत होत आहे. वणवे रोखण्यासाठी प्रबोधन व जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच वनविभाग व पुरातत्व विभागाने देखील अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तरच हा इतिहासाचा अमूल्य ठेवा चिरकाल टिकू शकेल.