नागोठण्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरु
नागोठणे/प्रतिनिधी
येथील कोएसोचे बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील केंद्र क्रमांक 2721 मध्ये बारावीच्या परिक्षेस आजपासून प्रारंभ झाला. या केंद्रांत कोएसोचे कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय, अंबानी फाउंडेशनचे उच्च माध्यमिक विद्यालय, भाएसोचे एस. डी. परमार इंग्लिश मिडियम स्कुल आणि नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे उर्दू कनिष्ठ महाविद्यालय आदी उच्च माध्यमिक शाळांमधील शास्त्र शाखेचे 267, वाणिज्य 154 आणि कला शाखेतील 133 असे एकूण 554 विद्यार्थी परिक्षा देत असल्याची माहिती केंद्रसंचालक विजय देवकते आणि विद्यासंकुलातील सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. एल. जांभळे यांनी दिली.
आज पहिला पेपर असल्याने केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालकवर्ग सुद्धा उपस्थित राहिला असल्याने केंद्राचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. परिसरातील गावांमध्ये राहणारा विद्यार्थीवर्ग एसटी बसेस, खासगी वाहने तसेच रिक्षांद्वारे एक तास अगोदरच नागोठणेत दाखल झाला असल्याने वेळेत म्हणजेच अकरा वाजता त्याला परिक्षेस बसण्याची संधी मिळाली होती.
बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात परीक्षेदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने कोठेही अनुचित प्रकार न घडता पहिल्या दिवशी परिक्षा शांततेत पार पडली.