‘आयपीएल’च्या तयारीसाठी धोनी सज्ज;२ मार्चपासून सरावाला प्रारंभ
२०१९मध्ये जून महिन्यात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यापासून ३८ वर्षीय धोनीने विश्रांती घेतली आहे. मात्र २९ मार्चपासून रंगणाऱ्या ‘आयपीएल’मध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना आढळणार आहे. एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर धोनीसह चेन्नईचे आणखी काही खेळाडू सरावाला प्रारंभ करणार आहेत.
‘‘आयपीएलच्या तयारीसाठी धोनी सज्ज झाला असून एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर २ मार्चपासून तो सरावाला प्रारंभ करणार आहे. धोनीसह चेन्नईचे अन्य खेळाडूही या सराव शिबिरात सहभागी असतील,’’ असे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन म्हणाले. सुरेश रैना, अंबाती रायुडू हे खेळाडूसुद्धा धोनीसह सरावाला सुरुवात करतील. तसेच चेन्नईच्या सर्व खेळाडूंच्या चमूच्या सराव सत्राला १९ मार्चपासून सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.
१३व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात चेन्नईसमोर कट्टर प्रतिस्पर्धी आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही लढत रंगणार असून गतवर्षी मुंबईने चेन्नईला दोन साखळी सामने, एक बाद फेरीचा सामना आणि अंतिम फेरी अशा एकूण चार लढतीत धूळ चारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा उभय संघांतील चढाओढ अनुभवण्यासाठी तमाम क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत.