शुभमंगल ज्यादा ‘सावधान’


शुभमंगल ज्यादा ‘सावधान’
‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातील ज्यादा हा शब्द खरे म्हणजे लग्न करणार्‍या त्या दोघांसाठी नव्हे तर त्या दोघांबरोबर एकमेकांशी जोडल्या जाणार्‍या कुटुंबीयांसाठी आहे. कारण, ज्यांना एकत्र यायचे आहे त्यांना मुळात लग्नाच्या विधिवत बेडीत अडकण्याची गरजच वाटत नाही. त्यांच्यासाठी गरजेचे आहे ते त्यांच्या कुटुंबाने त्यांना आहे तसे स्वीकारणे, आणि त्याबरोबर येणार्‍या त्यांच्या भावनांचाही तितक्याच सहजपणे स्वीकार करणे. आपण ज्या पद्धतीने स्त्री आणि पुरुषांचे प्रेम स्वीकारले आहे त्याच सहजतेने त्यांनी दोन पुरुषांच्या किंवा दोन स्त्रियांच्या प्रेमाकडेही पाहायला हवे. आणि अर्थात हा स्वीकार सहज नसेल, पण तो व्हायला हवा, ही गोष्ट हसतखेळत प्रेक्षकांच्या मनात उतरवणारा चित्रपट म्हणून हितेश केवल्य दिग्दर्शित ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट वेगळा ठरतो.
गेल्या काही वर्षांत सातत्याने समलिंगी व्यक्तींचे वास्तव मांडणार्‍या चित्रपटांनी बॉलीवूडची दारे ठोठावली आहेत. त्यातील बहुतांशी चित्रपट हे फार गांभीर्याने समलिंगी व्यक्ती, त्यांचे लैंगिक संबंध यांच्यावर भाष्य करणारे होते. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ चित्रपटाची मांडणी करतानाच दिग्दर्शकाने यातील मुख्य दोन व्यक्तिरेखा कार्तिक (आयुषमान खुराणा) आणि अमन (जितेंद्र कुमार) या दोघांनाही समलिंगी जोडपे म्हणूनच प्रेक्षकांसमोर आणले आहे. हे दोघेही एकमेकांच्या गाढ प्रेमात आहेत. समलिंगी असणे हा गुन्हा नाही, ते निसर्गाचेच वास्तव आहे. हे आपल्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या कार्तिकची घरातूनच हकालपट्टी होते. आता या दोघांसाठी आशेचा किरण आहे ते म्हणजे अमनचे कुटुंब. त्यातही अमनचे वैज्ञानिक वडील शंकर त्रिपाठी (गजराज राव). माझा बाप लोहार आहे, पण तुझे वडील तर वैज्ञानिक आहेत. ते नक्की आपल्याला समजून घेतील, ही कार्तिकची आशा साफ धुळीला मिळते. प्रत्येक गोष्टीत विज्ञान समजावून सांगणार्‍या आपल्या वडिलांना आपल्या प्रेमाचे विज्ञान समजून देण्यात अमनची घुसमट होत राहते. एकीकडे प्रेमासाठी काहीही करायची तयारी असलेला कार्तिक आणि दुसरीकडे अगदी टोकाला जाऊन अमनला जडलेला समलैंगिकतेचा आजार पळवण्यासाठी धडपडणारे त्रिपाठी कुटुंब या दोघांमध्ये अडक लेली अमन आणि कार्तिकची प्रेमकथा दिग्दर्शकाने अफलातून रंगवली आहे. मुळात, या चित्रपटातील व्यक्तिरेखा खूप सर्वसामान्य, आपल्या घराघरांतून दिसतील अशा आहेत. लेखक म्हणून अलाहाबादमधलं हे मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब. त्यांचे आपापसातले ताणेबाणे, दोन भावांमध्ये असूनही नसणारे अंतर, दोन जावांमध्येही जाणवणारा विसंवादी संवाद अशा अनेक गोष्टी यात आहेत. मोठे कसेही असले तरी त्याचा परिणाम आपल्यावर न होऊ देता प्रेमाची एकमेकांची परिभाषा समजून घेत आपापसांत घट्ट राहणारी भावंडे असे खूप बारीकसारीक तपशील यात लेखकाने भरले आहेत. दिग्दर्शक हितेश केवल्य यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे, त्यामुळे कथेतून आपल्याला नेमके काय पोहोचवायचे आहे लोकांपर्यंत याची स्पष्टता त्यांच्या लेखनात आणि दिग्दर्शनातही ठळकपणे जाणवते. त्यांचे कोणतेच पात्र मोठमोठे भाषण करताना दिसत नाहीत. समलिंगी आहोत म्हणजे कोणी वेगळे आहोत, हा त्यांचा पवित्राच नाही. नैसर्गिकरीत्या स्त्री-पुरुष जोडपे जसे एकत्र येईल, प्रेमात पडेल त्याच सहजतेने कार्तिक आणि अमन हे दोघे पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडतात. कार्तिक ने स्पर्श केल्यावर अमनच्या मनात घंटी वाजते, त्याचे अंग शहारून उठते. प्रेमातल्या सगळ्या भावना आपल्याला इतरांप्रमाणेच जाणवतात हे अमन आई आणि वडिलांना खूप सुंदरपणे जसे होते तसेच सांगताना दिसतो. एकीकडे या दोघांचा आपले प्रेम स्वीकारावे हा आग्रह खरा आहे. तितकाच अचानकपणे हा बदल समजून घेणे, स्वीकारणे हे आई-वडील म्हणून आपल्यालाही अगदी सहजसोपा नाही, हेही अमनच्या आईच्या माध्यमातून दिग्दर्शकाने मांडले आहे. याचा अर्थ या दोघांचे प्रेम अव्हेरले पाहिजे, असे नाही. मात्र यात प्रत्येकानेच एकमेकांना माणूस म्हणून समजून घेण्याची प्रत्येकावरची जबाबदारी लक्षात घ्यायला हवी, हेही दिग्दर्शक त्याच ओघात सांगतो. त्यामुळेच एरव्ही आपल्या मुलीला वार्‍यावर सोडून दिले म्हणून मोठया भावावर रागावलेला चमनकाका अखेरीस मात्र ३७७ कलमावरून पोलिसांसमोर वकील म्हणून मुद्देसूद मांडणी करताना दिसतो.  उत्तम पटकथा आणि उत्तम कलाकार ही या चित्रपटाची भक्कम बाजू आहे. समलैंगिकता हा धीरगंभीर चेहर्‍यानेच समजावून द्यायचा विषय आहे, या विचाराला छेद देत खूप सहजसोप्या शैलीत दिग्दर्शकाने हा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. यात आयुषमान खुराणा आणि जितेंद्र कुमार या मुख्य जोडीने चांगलीच साथ दिली आहे, मात्र आयुषमान यात जास्त भाव खाऊन जातो यात शंका नाही. अमनची व्यक्तिरेखाच थोडी समजूतदार दाखवली असल्याने कदाचित जितेंद्रला तितक्या खुलेपणाने मिरवता आलेले नाही. मात्र ती कसर बिनधास्त बेधडक कार्तिकच्या भूमिकेत आयुषमानने भरून काढली आहे. गजराज राव आणि नीना गुप्ता ही ‘बधाई हो’ चित्रपटातील सुपरहिट जोडी इथे पुन्हा त्याच फॉर्मात वावरली आहे. त्या दोघांना एकत्रित पाहणे ही पर्वणी आहे. त्यांच्या जोडीला मनुरिषी चढ्ढा, सुनीता राजवर आणि मानवी गगरू अशा उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. त्यामुळे अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट म्हणजे धम्माल अनुभव आहे. पण या धम्माल मौजमस्तीच्या साथीने या नव्या राज-सिमरन नव्हे जॅक आणि जॉन या जोडीची प्रेमकथा सांगणारा शुभमंगल लोकांना चांगल्या अर्थाने सावधान करणारा आहे, यात शंका नाही.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...