पुणे: मनसेच्या कार्यकर्त्याची राज ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार



पुणे: मनसेच्या कार्यकर्त्याची राज ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार


सहकारनगर पोलीस स्थानकात दाखल केली तक्रार




 



पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी शोधलेले तिघे संशयित घुसखोर बांगलादेशी पोलीस चौकशीमध्ये भारतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते तिघे कोलकता आणि उत्तर प्रदेश भागातील मूळचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सहा तासाच्या चौकशीनंतर या तिघांनाही पोलिसांनी सोडून दिले. मात्र आता या तिघांपैकी रोशन शेख याने मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धक्कदायक बाब म्हणजे रोशन हा मनसेचाच कार्यकर्ता आहे. २००९-१० साली आपण मनसेसाठी पुण्यात काम केल्याचा दावा रोशनने केला आहे.




कोण आहे रोशन शेख?


बालाजीनगरमधील गुलमोहर सोसायटीमध्ये राहणारा रोशन पुणेकरांना लाजवेल अशी अस्खलित मराठी बोलतो. “मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक अमराठी तरुणांना पक्षात सामील होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार राज ठाकरेंच्या भाषणाने प्रभावित होऊन मी मनसेचा कार्यकर्ता म्हणून काम करु लागलो. माला पक्ष सदस्याचे ओळखपत्रही देण्यात आलं होतं,” असं रोशनने ‘पुणे मीरर’शी बोलताना सांगितलं आहे.


मूळचा पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील असणारा रोशन पुण्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतो. घडलेल्या प्रकाराबद्दल रोशनने, “घडलेला प्रकार चुकून झाला असेल पण यामुळे मी आणि माझे कुटुंबिय दुखावले गेलो आहोत. मी मागील अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये राहत आहे. माझ्या आजूबाजूचे अनेकजण आम्हाला चांगलं ओळखतात. यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसेल. असं असलं तरी मला त्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा द्वेष वाटत नाही,” असं मत व्यक्त केलं आहे. “मनसेच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना मी राज ठाकरेंच्या पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम करायचो हे ठाऊक आहे”, असं रोशन सांगतो. “मी त्यांना ओळखपत्रेही दाखवली तरी मी ज्या पक्षासाठी काम केलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला राष्ट्रीयत्वाबद्दल प्रश्न विचारल्याने दुखावलो गेलो,” असं रोशन म्हणाला.


त्या दिवशी नक्की काय घडलं?


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात भूमिका मांडल्यानंतर, मुंबई मधील मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या पाठोपाठ शनिवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनकवडी आणि बालाजीनगर भागातील गुलमोहर अपार्टमेंट तसेच त्या परिसरात बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांसोबत सहकारनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यावेळी संशयित म्हणून तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या तिघांकडे सहकारनगर पोलिसानी सहा तास चौकशी केली. त्या तिघांकडील कागदपत्रांच्या आधारे ते बांगलादेशी नसून उत्तर प्रदेश आणि कोलकता भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसानी चौकशी करून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोडून दिले. त्यामुळे मनसेने घुसखोर बांगलादेशी विरोधात काढलेल्या पहिल्याच शोध मोहिमेत, तिघा भारतीयांनाच दिवसभर पोलिस स्टेशनच्या चौकशीला सामोरे जावे लागल्याचे पाहण्यास मिळाले. रोहनबरोबरच दिलशाद मन्सुरी आणि बप्पी सरदार या दोन भारतीयांना याप्रकरणाचा मनस्ताप सहन करावा लागला.


या तिघांचे वकील म्हणतात…


“मनसेचे कार्यकर्ते या तिघांच्या घरात घुसले आणि त्यांनी यांच्याकडे अगदी चुकीच्या पद्धतीने ओळखपत्रांची मागणी केली. याप्रकरणात आम्ही सहकारनगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणातील कार्यकर्त्यांविरोधात आणि सहभागी असणाऱ्या पोलिसांविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत,” असं या तिघांना मदत करणारे वकील तोसिफ शेख यांनी सांगितलं.


रोशनबद्दल मनसेचे स्पष्टीकरण…


मनसे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी पोलिसांना सोबत घेऊन आम्ही ही कारवाई केली होती. रोशनवर आम्हाला संक्षय नव्हता असा दावाही शिंदेंनी केला आहे. “या कारवाईदरम्यान केवळ चौकशीसाठी रोशनला ताब्यात गेण्यात आलं. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले. तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता असं आम्ही कधी म्हणालोच नाही,” असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे. “आम्ही पुढील नियोजन करुन अशापद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने भारतात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात कारवाया सुरुच ठेऊ,” असंही शिंदे यांनी सांगितलं.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...