नेरळ-माथेरान घाट रस्ता हस्तांतरणाची घाई


नेरळ-माथेरान घाट रस्ता हस्तांतरणाची घाई
रस्त्याचे काम अर्धवट असताना ठेकेदारावर एमएमआरडीएची खप्पामर्जी
कर्जत/संतोष पेरणे
नेरळ-माथेरान घाट रस्त्याचे मजबुतीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. रस्त्याचे अर्धकाम देखील झाले नसताना एमएमआरडीएने रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरण करून घ्यावा, अशी सूचना पत्रव्यवहार करून केली आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम झाले पूर्ण झालेले नसताना प्राधिकरणने आपल्या ठेकेदाराला सांभाळण्यासाठी ही मखलाशी केली आहे.
2016 मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे मजबुतीकरणासाठी 27 कोटी रुपयांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून सुरू करण्यात आले. 27 कोटी रुपयांच्या निधीमधून रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी कॉंक्रीटची गटारे, रस्त्यात असलेल्या दरीच्या बाजूला संरक्षक भिंती आणि डांबरीकरण ही कामे तसेच घाटात जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट आणि बैठक व्यवस्था करण्याचे निविदेत नमूद होते. घाटात आतापर्यंत रस्त्यात संपूर्ण सात किलोमीटर भागात म्हणजे कर्जत-कल्याण रस्त्यावरील हुतात्मा चौकातून दस्तुरीनाका पूर्णपणे एकही बाजूला आरसीसी गटारे बांधलेली नाहीत. त्याचवेळी घाट रस्त्यात कुठेही अखंडपणे संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाहीत. तर घाटमार्गात हुतात्मा चौक ते जुमापट्टी या भागातील रस्त्यावर डांबरीकरण केले होते. पण आजच्या घडीला या भागात अनेक ठिकाणी डांबर वाहून गेले आहे. दरीच्या बाजूला रस्ता अनेक ठिकाणी नवीन डांबरीकरण खचले आहे. तर याच घाटरस्त्यात खड्डे भरण्याचे काम मुंबई येथून आलेल्या एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने भरले होते. पण त्या ठिकाणी टाकलेले डांबर निकृष्ठ दर्जाचे असल्याने सर्व डांबर वाहून गेले आहे. तो रस्ता पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी एमएमआरडीएला घाटरस्ता 13 तास वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता.
रस्त्यावर बांधलेल्या गटारावर क्रश बॅरिअर लावण्यात आले आहेत. ते काम देखील 100 टक्के पूर्ण नसताना एमएमआरडीएने मे 2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून नेरळ-माथेरान घाट रस्ता हस्तांतरण करून घेण्याची सूचना केली होती. 
ही घाई कशासाठी असा प्रश्‍न निर्माण झाला असून घाट रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्याने घाट रस्ता बंद करावा लागत असेल तर प्राधिकरण आपल्या ठेकेदाराला सांभाळण्यासाठी असा पत्रव्यवहार करीत आहे असा आरोप देखील होत आहे. ते आजही कायम असून रस्त्यावरील संरक्षण भिंती कोसळण्याची स्थिती असताना रस्ता हस्तांतरण घाई कशाला असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...