गावठी बनावटीच्या बंदुका बनवून विक्री करणारी टोळी जेरबंद
नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक; 12 बंदुकांसह साहित्य जप्त
नवी मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे तसेच खरेदी-विक्री करणार्यांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त संजय कुमार, पोलिस सहआयुक्त यांनी आदेशित केले होते. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रविणकुमार पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी अवैधरित्या अग्निशस्त्रे व दारूगोळा तयार व खरेदी-विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू केली होती.
त्यानुसार मंगळवारी (ता. 18) मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार सतिष सरफरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत पनवेल तालुक्यातील दानफाटा परिसरात देशी बनावटीच्या बंदुका विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे सापळा लावून परशुराम राघव पिरकड (वय 40 वर्षे, रा. नानीवली, ता. खालापूर, जि. रायगड), दत्ताराम गोविंद पंडीत (वय 55 वर्षे, मु. खरवंडी, ता. कर्जत, जि. रायगड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात गावठी बनावटीच्या बारा बोअरच्या 10 बंदूका, 2 काडतुसे, मोबाईल फोन व एक पल्सर मोटर सायकल तसेच तपासामध्ये त्यांच्याकडून 8 अर्धवट बंदूका व बंदूका बनविण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 24 फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश तांबे, ज्ञानेश्वर भेदोडकर, राणी काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, पोलिस हवालदार सतिश सरफरे, शशिकांत शेेंडगे, पोपट पावरा, मोहन कदम, ज्ञानेश्वर बनकर, पोलिस नाईक विष्णू पवार, प्रकाश साळुंखे, सागर हिवाळे, दिलीप भास्करे, सतिश चव्हाण, मिथुन भोसले, पोलिस शिपाई मेघनाथ पाटील, रूपेश कोळी यांनी केली आहे.
आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये आरोपी दत्ताराम गोविंद पंडीत याने 10 वी शिक्षणानंतर इलेक्ट्रिशनचा कोर्स केलेला आहे. तसेच आरोपी परशुराम राघव पिरकड हा सुतारकाम करतो. नमुद आरोपी हे पाच-सहा वर्षांपासून पनवेल, खोपोली, कर्जत परिसरातील परवाना असलेल्या बंदुका दुरूस्तीचे काम करत होते. दोन-तीन वर्षांपासून त्यांनी स्वत:च 12 बोअरच्या बंदुका तयार करून विकल्या आहेत. देशी बंदुका बनविण्यासाठी लागणारे साहित्य कुर्ला, कर्जत, खोपोली व चौक याठिकाणाहून खरेदी केले आहे. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे बंदुका तयार करून कर्जत, पनवेल परिसरामध्ये विकल्याचे सांगितले असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.