परीक्षा केंद्रांकडे जाणार्या मार्गावर वाहतुक पोलिसांची गस्त
..............................
दहावीच्या विद्यार्थ्यांना पनवेल संघर्ष समितीच्या ‘अनोख्या शुभेच्छा‘
..............................
परीक्षा केंद्रांपर्यंतचा प्रवास निर्धोक होण्यासाठी वाहतुक पोलिसही दक्ष
पनवेल/प्रतिनिधी
परीक्षार्थींना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रापर्यंत निर्धोक पोहचता यावे, याकरीता पनवेल विभागीय वाहतुक खात्याने केंद्रांकडे जाणार्या रस्त्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये आणि त्याचा फटका परीक्षार्थींना बसू यासाठी दक्षता घेतली आहे. पनवेल संघर्ष समितीने केलेल्या सुचनेला सकारात्मकतेने घेत वाहतुक खात्याने परीक्षा केंद्रांभोवतीच्या रस्त्यांवर वाहतुक पोलिसांनी नियुक्ती करण्याचे आदेश बजावले आहेत.
आज, मंगळवारी (ता.18) पासून दहावीच्या विद्यार्थ्यांची, जीवनाच्या महत्वाच्या टप्प्याच्या वळणावरील परीक्षेला सुरूवात होत आहे. सगळीकडे वाढत्या वाहतुकीमुळे वाहतुक कोंडीच्या नेहमीच्या समस्येत अधिक भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पनवेल विभागीय वाहतुक खात्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र चव्हाण यांना वाहतुक कोंडी टाळून दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंतच्या प्रवासात दिलासा देत त्यांचा प्रवास निर्धोक होण्यासाठी काही सुचना केल्या आहेत.
त्या अनुषंगाने चव्हाण यांनी तातडीने बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे पनवेल वाहतुकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते, कळंबोलीचे अंकुश खेडकर, तळोजेचे राजेंद्र आव्हाड, खारघरचे आनंद चव्हाण, नवीन पनवेल मधुकर भटे आदी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत.
पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, नावडे, खांदा कॉलनी आणि खारघरमध्ये काही शाळांध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची राज्य शासनाच्या परीक्षा विभागाने निवड केली आहे. त्यानुसार उद्यापासून काही सुट्ट्या वगळता परीक्षा पुढे सुरू राहणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत तणावविरहित विद्यार्थ्यांना जाता यावे, यासाठी केंद्रांकडे जाणार्या मार्गावर वाहतुक कोंडी होणार नाही, याची प्रामुख्याने दक्षता घेण्याची सुचना चव्हाण यांना करताच, त्यांनी कार्यालयीने आदेश काढून तात्काळ बिनतारी संदेश बजावले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांकडे जाणार्या रस्त्यांवर वाहतुक खात्याच्या पोलिसांची गस्त सातत्याने परीक्षा काळात राहिल, अशी माहिती चव्हाण यांनी कडू यांना दिली आहे.
निःशंक हो, निर्भय हो मना रे ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे॥