रायगड शंभर टक्के बंद
बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट
पेट्रोल पंप, रेल्वे, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प
पोलिसांचा कडक बंदोबस्त
पेण/अरविंद गुरव
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे इटली, चीन आदी देशात गेलेल्या बळींची संख्या पाहता आपल्या देशात या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ आवाहनाला जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी घरातच बसून राहता यावे यासाठी महिला वर्गाने शनिवार सकाळपासून भाजीपाला, किराणा मालाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गाठली होती.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासोबतच आरोग्य अधिकारी-कर्मचारी, पोलिस मोठ्या हिंमतीने काम करीत असून आपल्या जीवाची कुठलीही तमा न बाळगता हे लोक दिवस-रात्र एक करीत आहेत. मनाई आदेशाच्या विरोधात सुरुवातीला काही काळ लोकांचा तक्रारींचा सूर असला तरी या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागू नये म्हणून गर्दी टाळणे, स्वच्छता राखणे, सहप्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विषाणूच्या पसरण्याची व्याप्ती वाढू नये, लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी एक दिवसीय कर्फ्यूचे आयोजन आज (रविवारी) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत करीत कोणीही घराच्या बाहेर पडू नये या आवाहनाला गाव-पाड्यातून मोठा प्रतिसाद मिळाला.
या आवाहनाला पाठिंबा देऊन या जनता कर्फ्युमध्ये रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्व ग्रामपंचायती आणि शहरांनी सहभाग घेतला आहे. आज या जनता कर्फ्युला पेणमधील नागरिकांनी शंभर टक्के पाठिंबा देऊन पोलिस प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. पेण शहराला लागून असणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत असतो. वाहन चालक देखील या वाहतूक कोंडीला पुरते कंटाळलेले असतात. मात्र आजच्या जनता कर्फ्युमुळे या महामार्गावर देखील पूर्णपणे शुकशुकाट दिसत असल्याने आज हा महामार्ग देखील मोकळा श्वास घेताना दिसला. पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्ह्यातील अनेक घाऊक विक्रेते पेणच्या बाजारपेठेत भाजी घेण्यासाठी येत असतात. मात्र या भाजी विक्रेत्यांनी देखील आपली बाजारपेठ बंद ठेऊन या जनता कर्फ्युमध्ये सहभाग घेतला आहे.
तालुक्यातील विक्रम-मिनिडोअर, इको टॅक्सी, रिक्षा संघटना यांसह व्यापारी संघटनेने आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. पेणच्या रेल्वे स्थानकात देखील शुकशुकाट पाहायला मिळला. बस स्थानकात सुद्धा नेहमी रस्त्यावर धावणारी सर्वांची लाडकी लालपरी स्थानकातच उभी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेण तालुक्यातील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील जनतेने देखील या बंदला उत्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
पेणमध्ये असणार्या वडखळ, पेण आणि दादर सागरी पोलिस ठाण्यातील पोलिस प्रशासनाने काल सायंकाळ पासूनच चोख पोलिस बंदोबस्त ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे आज सतत पोलिस पेणमध्ये फिरत असताना दिसत होते.आजच्या या जनता कर्फ्युतून फक्त अत्यावश्यक सेवा आणि रुग्णवाहिकांना रस्त्यावरून प्रवेश देण्यात येत होता.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनाचे बोर्ड गावागावात लावण्यात आले होते कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ग्रामस्थांनी आपल्या दारात उभे राहून पोलिस, डॉक्टर, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसेच अत्यावश्यक सेवेत सहभागी असलेल्याच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवून, थाळी अथवा अन्य वाद्य वाजविण्याचे आवाहन सरपंचांच्यावतीने करण्यात आले होते. त्याला पेण तालुक्यासह पेण शहरात चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. तर दुसरीकडे आपल्या गावात येणार्या पर्यटकांना, फेरीवाले, बाहेर गावच्या व्यक्तीमार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत गाव बंदी घालण्यात आली आहे. अशी बाहेरून एखादी व्यक्ती गावात आल्यास विनंती पूर्वक त्यांना आपल्या घरी जाण्याची विनंती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज देशभरातील जनता घरात बसून असल्याने आणि त्यात रविवार असल्याने अनेक कुटुंबीयांनी बर्याच वर्षांनी असा एकत्र येण्याचा योग आल्याने आपली नातवंड-पंतवंड, नोकरीसाठी कामानिमित्त बाहेर असणारे कुटुंबीय यांनी एकत्र येऊन घराबाहेर न पडता घरातच खमंग जेवण, पुस्तक वाचन, नातवंडांसोबत घरातच खेळणे, गप्पा-टप्पा मारणे आणि महत्वाचे म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देत या दिवसाची सांगता केली आणि कोरोनाला रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपला एक दिवस देशासाठी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानामुळे सर्वत्र पेण तालुक्यात जनता कर्फ्यू आहे. यावेळी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त आहे. जर कोणी रस्त्यावर दिसले तर त्याची चौकशी केली जात आहे. अतिआवश्यक सेवा उघड्या असल्याने कोणी दवाखान्यात, हॉस्पिटल किंवा मेडिकल या ठिकाणी औषधोपचार करण्यासाठी जाऊ शकतील.
- नरेंद्र पाटील (पोलिस उपनिरीक्षक, पेण)