काळुंद्रेकरहो, तुमच्यासाठी... दिड कोटी !





काळुंद्रेकरहो, तुमच्यासाठी... दिड कोटी ! 

पावसाळ्यापूर्वी डागडुजी नंतर डांबरीकरण 

काळुंद्रे ते तक्का पुलासाठी 5 कोटीची तरतूद 

पनवेल: महापालिकेच्या प्रभाग वीसमध्ये अंतर्भूत असलेलले काळुंद्रे गाव आणि वसाहतीतील रस्त्यांची तातडीने डागडुजी आणि पावसाळ्यानंतर संपूर्ण डांबरीकरणाचे दोन स्तर देण्यासाठी सिडकोकडून दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात पनवेल संघर्ष समितीला यश आले आहे. आज, ही माहिती सिडकोचे पनवेल विभागीय अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून पनवेल-पळस्पे रस्त्याला जोडून काळुंद्रे गाव आणि नवीन वसाहतीमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. वसाहतीमधील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत साक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यास सुचविले होते. अंतर्गत रस्ते आणि काळुंद्रे ते तक्का या गाढी पुलासाठीची त्यांची मागणी होती. त्यानुसार कडू यांनी अंतर्गत रस्ते करण्यासाठी केलेल्या मागणीनुसार एक कोटी बासष्ठ लाख रुपयांच्या कामाला सिडकोने मंजुरी दिली आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि पावसाळ्यानंतर त्या रस्त्यांचे संपूर्ण डांबरीकरण करण्याची योजना यातून आखण्यात आल्याची माहिती रोकडे यांनी आज कडू यांना दिली.

 

काळुंद्रे ते तक्का पुलासाठीही 5 कोटीची तरतूद 

काळुंद्रे ते तक्का उड्डाणपुलाच्या सिडकोच्या पूर्वनियोजित आराखड्याला आधीच ओएनजीसीने खोडा घातल्याने तो प्रस्ताव सिडकोने बासनात गुंडाळला होता. कडू यांनी पुन्हा त्या कामाला गती दिली आहे. सिडकोच्या नियोजनकार गीता पिल्लेज यांच्याकडे कडू यांनी तगादा लावल्यानंतर त्या पुलाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. तर रोकडे यांनी त्या करीता पाच कोटी रुपयांच्या निधीसाठी वरिष्ठांकडे मंजुरीसाठी शिफारस केली आहे. या प्रश्नावर सिडको भवनात पुढच्या आठवड्यात बैठकीत चर्चा होणार आहे. ओएनजीसी आणि सिडकोच्या समन्वयातून तो प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कडू प्रयत्नशील आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.


 

 

 



 

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...