106 वर्षीय बामीबाई म्हात्रे यांचे निधन
पनवेल: पनवेल तालुक्यातील मोहो गावातील 106 वर्षीय आजी बामीबाई पोशा म्हात्रे यांचे वृद्धापकाळाने रविवारी (ता. 15) निधन झाले. मोहो गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमिळावू स्वभावाच्या आणि गरजूला मदत करणार्या बामीबाई म्हात्रे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. दानशूर वृत्तीच्या आजीबाईंना पंचक्रोशित ‘बाय’ नावाने ओळखले जात होते. आपल्या अनुभवाच्या जोरावर आयुर्वैदिक उपचार पद्धतीने ठिक-ठाक करणार्या आजीबाईंना घरगुती आणि नैसर्गिक वनौषधींचे चांगलेच ज्ञान होते. अनेकांना याचा प्रत्यय आला आहे. तसेच आयुष्याची शंभरी गाठण्यामागे हेच गमक असल्याचे आजीबाई नेहमी सांगत.
जानेवारी 2020 मध्ये त्यांनी वयाची 106 वर्षे पूर्ण केली. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून प्रकृती त्यांना साथ देत नव्हती.
रविवारी (ता. 15) सकाळी 6.05 मिनिटांनी आजी बामीबाई म्हात्रे पंचतत्वात विलीन झाल्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, सात मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
बामीबाई म्हात्रे यांचा दशक्रिया विधी नाशिक येथे मंगळवारी (ता. 24) होणार आहे, तर उत्तरकार्य शुक्रवारी (ता. 27) होणार असल्याचे म्हात्रे कुटूंबियांनी सांगितले.