बेरोजगार तरुणाचा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
कळंबोलीतील धक्कादायक घटना; पोलिसांनी केली अटक
कळंबोली/प्रतिनिधी
छिन्नी व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने कळंबोलीतील इंड्सईड बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला कळंबोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. रोशन चंद्रकांत मोडक (20) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एटीएम फोडण्यासाठी आणलेले साहित्य जप्त केले आहे. काम मिळत नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला रोशन चंद्रकांत मोडक हा तरुण मुळचा सातारा जिल्ह्यातील असून दोन महिन्यापुर्वी तो सातारा येथून कामानिमित्त कळंबोलीत आला होता. मात्र गत 2 महिन्यामध्ये त्याला काहीच काम न मिळाल्याने त्याने एटीएम मशीन फोडून त्यातून रक्कम चोरण्याची शक्कल लढविली.
त्यानुसार मध्यरात्री तो कळंबोलीतील वरुण बारच्या बाजुला असलेले इंड्सईंड बँकेचे एटीएम मशीन फोडण्यासाठी गेला होता. यावेळी रोशन याने आपल्या जवळच्या छिन्नी-हातोडी व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यास सुरुवात केली. मात्र पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास कळंबोली पोलिस ठाण्यातील बीट मार्शल गस्त घालत या भागात आले असताना, रोशन मोडक हा एटीएम मशीन फोडताना निदर्शनास त्यांच्या आला. त्यामुळे बीट मार्शल पोलिसांनी इतर सहकार्यांना त्याठिकाणी बोलावून त्यांच्या मदतीने रोशनला ताब्यात घेतले. तसेच एटीएम मशीन फोडण्यासाठी त्याने आणलेले छिन्नी, हातोडी, स्क्रू ड्रायव्हर व इतर साहित्य जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी रोशन मोडक याच्यावर एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.