धक्कादायक! भारतात करोनाचे २८ रुग्ण; केंद्र सरकारची माहिती
दिल्लीसोबत देशभरात करोना व्हायरससंबंधी अलर्ट जारी आहे. भारतात करोनाचे एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. सध्या करोना व्हायरसंबंधी देशात काय स्थिती आहे यासंबंधी हर्षवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली. राजधानी दिल्लीत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली तर तयारीच्या दृष्टीकोनातून रुग्णालयांना चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती यावेळी हर्षवर्धन यांनी दिली.
दिल्लीमधील प्रकरणात आम्हाला माहिती मिळाली आहे की, पीडित जवळपास ६६ लोकांच्या संपर्कात आला होता. आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाली असल्याची निष्पन्न झालं आहे. तसंच तेलंगणामधील प्रकरणीत पीडित ८८ लोकांच्या संपर्कात आला होता अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दरम्यान देशभरात एकूण २८ जणांना करोनाची लागण झाली असून यामधील तिघांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्यात सुधारणा झाली असल्याचं यावेळी हर्षवर्धन यांनी सांगितलं.
इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील १६ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. हा भारतीय त्यांचा टुरिस्ट गाइड म्हणून काम करत होता. या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जर इराण सरकार आमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यास तयार असेल तर आम्ही तिथे एक टेस्ट लॅब उभी करण्याचा विचार करत आहोत. यामुळे तिथे स्क्रिनिंग केल्यानंतर इराणमधील भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यात मदत होईल”. दरम्यान यावेळी त्यांनी आतापासून यादी करण्यात आलेल्या फक्त १२ देशांची नाही तर सर्व विमानं आणि प्रवाशांची स्क्रिनिंग केली जाणार असल्याचं जाहीर केलं.