मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली



मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली, ८८ प्रवासी सुखरुप





गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाणारी एक प्रवासी बोट बुडाली आहे. शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मांडवा जेट्टीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना ही बोट बुडाली. अंजठा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. बोटीमध्ये एकूण ८८ प्रवासी होते.


बोटीतील सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. जेट्टीजवळ पोहोचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन ८० प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.


अजंठा कंपनीची ही लाकडी बोट होती. या बोटीची प्रवासी वहनक्षमता  ५० ते ६० आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अंजठा बोटीतील प्रवाशी हादरुन गेले. सुदैवाने त्यावेळी पोलिसांची पेट्रोलिंग बोट तिथे असल्याने सर्व निभावले. तीन ते चार कंपन्या गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक करतात. इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते.


रायगड जिल्ह्यातंर्गत येणाऱ्या अलिबाग तालुका पर्यटनाने समृद्ध आहे. इथल्या वेगवेगळया समुद्र किनाऱ्यावर शनिवार-रविवार पर्यटक मोठया संख्येने येत असतात. रस्त्याऐवजी सागरी मार्गाने वेळ वाचत असल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची पहिली पसंती बोटीला असते. पण या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


कशामुळे बुडाली बोट?
मांडवा बंदराजवळ ही बोट येत असताना अचानक बोटीत बिघाड झाला व पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तातडीने पाठवून दिले. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...