निर्भया बलात्कार प्रकरण : पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
लवकरच नवीन डेथ वॉरंट निघणार
निर्भया हत्या प्रकरणात यापूर्वीच्या आदेशानुसार, चारही दोषींना मंगळवारी (३ मार्च) सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार होती. या चौघांच्या फाशीची अंमलबजावणी आतापर्यंत तिसऱ्यांदा पुढे ढकलली गेली आहे. त्यात दोषी पवन गुप्ता याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. त्यामुळे राष्ट्रपती निर्णय देईपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी दिला होता.
‘पवन गुप्ताने दया याचिका केल्यामुळे सर्व दोषींविरुद्धच्या ‘डेथ वॉरंट’ची अंमलबजावणी राष्ट्रपतींनी निर्णय देईपर्यंत लांबणीवर टाकण्यात येत आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. पवन गुप्ताने सोमवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तशी माहिती त्यानं न्यायालयाला दिली होती. त्याचबरोबर फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केली होती.
पवन गुप्ताच्या दया याचिकेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दुपारी निर्णय दिला. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली असून, आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही आरोपींना फाशी देण्यासंदर्भात लवकरच डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.
आरोपींनी तीन वेळा दिली मृत्यूला हुलकावणी –
मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ जारी करताना, त्यांना ३ मार्चला फाशी द्यावे, असा आदेश न्यायालयाने १७ फेब्रुवारीला दिला होता. यापूर्वी ७ जानेवारीला पहिल्यांदा ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले होते आणि त्यांची अंमलबजावणी १७ जानेवारी व नंतर ३१ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.