विघ्नहर्त्याकडे ‘भाविकांची पाठ’


विघ्नहर्त्याकडे ‘भाविकांची पाठ’
कोरोनाच्या भीतीने संकष्टी चतुर्थीला पालीत ‘शुकशुकाट’
पाली/प्रतिनिधी
अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात असलेल्या पालीतील बल्लाळेश्‍वर मंदिरात एरव्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते, मात्र गुरुवारी (ता. 12) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोरोनाच्या भीतीने  मंदिराकडे भाविकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले. एरव्ही पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते. यंदा होळीसारख्या सणावर देखील कोरोनाचे संकट दिसून आले. 
बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रतिबंधात्मक  उपाययोजना म्हणून कोरोनाविषयी जनजागृती करणारी माहिती व सेनेटिझर देऊन दक्षता घेण्यात आली. या दिवशी पाली बाजारपेठ, हॉटेल व दुकानात देखील शुकशुकाट पहावयास मिळाला. संपूर्ण जगभरात सद्यस्थितीत कोरोना विषाणूंनी असंहार माजविला असून भारतासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे सावट  निर्माण झाले आहे. हा आजार संसर्गजन्य असून त्याचा फैलाव जलदगतीने होत आहे. त्यामुळे सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लोक जाण्यास टाळत आहेत. शासकीय कार्यालये, बाजारपेठा, सार्वजनिक कार्यक्रम, मंदिर आदी ठिकाणी लोक जाणे टाळत आहेत. याबरोबरच तिथीनुसार शिवजयंतीचे गावोगावी कार्यक्रम असल्याने देखील मंदिर परिसरात गर्दी नसल्याचे बोलले जात आहे. 
कोरोनाच्या आजाराबाबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून मोबाईलच्या कॉलरटोनवर देखील याविषयी जनजागृती केली जात आहे. असे असले तरी या आजाराची भीषणता व उपचारपद्धती उपलब्ध नसल्याने लोकांच्या मनात अधिकच भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक  गर्दीच्या ठिकाणी जाण्यास कुणीही धजावताना दिसत नाहीत. परिणामी व्यावसायिक, दुकानदार, मिठाईवाले, पेढेवाले, हार फुलांचे व्यापारी, हॉटेल्स यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एकूणच ही परिस्थिती केव्हा पूर्ववत होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...