अल्पवयीन मुलांना कामावर राबवून घेणार्या सोने-चांदी कारागिरविरोधात गुन्हा दाखल
पनवेल/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलांना सक्तीने सोन्याचे मणी बनविण्याच्या कामाला लावून त्यांना फुकट बारा-बारा तास राबवून घेऊन मारहाण करणार्या पनवेलमधील अमर साहु शेट या सोन्या-चांदीच्या कारागिराविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे येथील सलाम बालक ट्रस्ट रेल्वे चाईल्ड लाईन या संस्थेने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. पनवेल मधील सोन्या-चांदीचा कारागीर अमर साहु शेट या कारागीराने पाच महिन्यापुर्वी पश्चिम बंगाल येथून 13 वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना कामासाठी पनवेल येथे आणले होते. त्यानंतर अमर शेट याने दोन्ही अल्पवयीन मुलांना सक्तीने सोन्याचे मणी बनविण्यासाच्या कामाला लावले होते.
यादरम्यान, अमर शेट या दोन्ही मुलांना सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत राबवून घेऊन त्याबदल्यात त्यांना दोनवेळ नाष्टा व दोन वेळचे जेवण देत होता. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा मेहनताना देत नव्हता. या मुलांकडून कामात काही चुक झाल्यास त्यांना शिवीगाळ व मारहाण करुन त्यांचा मानसिक व शारीरीक छळ करत होता. या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनी गत 3 मार्च रोजी आपल्या मुळ गावी कलकत्ता येथे जाण्यासाठी अमर शेट याच्या दुकानातून पलायन करुन ठाणे रेल्वे स्टेशन गाठले.
यावेळी दोन्ही मुले ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींच्या हाती लागल्यानंतर त्यांनी या दोन्ही मुलांकडे विचारपुस केल्यानंतर त्यांनी आपली हकीगत सांगितली. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी दोन्ही मुलांना बाल कल्याण समिती ठाणे यांच्या समोर हजर करुन बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सलाम बालक ट्रस्ट, ठाणे रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रकल्प समन्वयक सेजल माने यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी पनवेलच्या कच्छी मोहल्ला परिरसरात राहणार्या सोन्या-चांदीचा कारागीर अमर शेट याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.