आधी कोंढाणे धरण कर्जतचे, मग सिडकोचे!


आधी कोंढाणे धरण कर्जतचे, मग सिडकोचे!
कर्जत तालुक्याची पाण्याची मागणी पूर्ण केल्यानंतर इतर पाणी सिडकोला 
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
कर्जत/संतोष पेरणे
फडणवीस सरकारने कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण सिडको महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोंढाणे धरणावर आधी कर्जत तालुक्याचा अधिकार असून धरणाचे पाणी कर्जत शहरापर्यंत उल्हासनदीत आणले जाणार आणि त्यानंतर कर्जत तालुक्याची मागणी आहे, तेवढे पाणी वगळून इतर पाणी सिडकोला दिले जाईल. मात्र त्याआधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, जागेचा मोबदला हे प्रश्‍न आधी मार्गी लावावे लागतील, त्यासाठी स्थानिक आमदारांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्यावर सिडको सकारात्मक नसेल तर वेगळा विचार सरकार करेल असे निर्देश त्यांनी दिले आहे.
विधानभवनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात रायगड जिल्ह्यातील आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, आ. अनिकेत तटकरे आदीसह मुख्य सचिव आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आ. महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघातील विविध प्रश्‍न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवले. त्यात कोंढाणे धरणाचे काम का थांबले आहे? यांची माहिती देण्याचे आणि धरणाच्या कामाला पुन्हा गती देण्याबाबत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांना उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कोंढाणा धरण सिडकोला वर्ग करण्याबाबत चर्चा झाली असता, सिडको व्यवस्थापकीय संचालकांना मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे निर्देश दिले. 
धरण झाल्यानंतर ते पाणी पुढे कर्जत शहरापर्यंत उल्हास नदीमध्ये सोडले जावे, तसेच कर्जत तालुक्याकरिता पाणी पुरवठा आरक्षित ठेऊन उर्वरित पाणी सिडकोला योग्य मोबदला देण्याच्या अटीवर चर्चा करण्यात आली. 
कर्जत तालक्यातील पाली-भुतीवली लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम अपूर्ण असून त्या धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आधुनिक मशिनरी तसेच वाढीव खाटा आणि डॉक्टरांची नियुक्ती याबाबत बैठकीत चर्चा झाली. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला 100 खाटांचा दर्जा देण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिले. या सर्व विषयांवर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...