खेळाडूंची खारघरहून सुटका
सात दिवस घरातून बाहेर पडण्यास बंदी
खारघर/प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या निगराणी खाली असलेले दुबई आणि इतर देशातून आलेल्या 34 भारतीय नागरिकांची काल रात्री उशिराने सुटका केली. त्यामुळे खारघर येथील ग्रामविकास भवनात आता फक्त 14 जणांना ठेवले आहेत. रात्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिलेल्या निर्देशानंतर ही सुटका करण्यात आली. त्यात पनवेल, खोपोली आणि उरण येथील दुबईहून आलेल्या क्रिकेट खेळाडूंचा समावेश आहे.
कोरोनाचे विषाणू भारतात आणि मुखत्वे महाराष्ट्राला गिळंकृत करण्याच्या तयारीत असतानाच राज्य शासनाने त्या विरोधात मोठा लढा उभारण्याची तयारी सुरू केली. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळावर परदेशातून येणार्या नागरिकांची रोजची वाढती संख्या पाहता त्या शहरांभोवती कोरोनाविरुध्दची लढाई अधिक तीव्र केली. पनवेल हे मुंबई आणि पुण्याजवळ मध्यवर्ती ठिकाण आणि मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने राज्य शासनाने सजगतेने पनवेलचा विचार केला आहे.
त्यातच दुबई आणि इतर देशात कामधंदा, पर्यटन आणि तेथील नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन येणार्यांची संख्या दिवसेंदिवस अधोरेखित होत असल्याने पनवेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या नकाशावर आहे. या सगळ्या धावपळीत कामोठे येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे कस्तुरबा रुग्णालयातून स्पष्ट केल्याने यंत्रणा पायाला चक्री बांधून फिरू लागली.
दुसर्याच दिवशी रायगड आणि पनवेलचे 18 खेळाडू दुबईतून परतले. त्यांनी राज्य सरकारच्या आदेशांना काळे फासल्याने त्यांची महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार धरपकड सुरू केली. त्यांना ग्रामविकास भवनातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. तिथेही त्यांनी आदेश धुडकावून क्रिकेट सामने खेळत कोरोना आणि राज्य सरकारची खिल्ली उडवली.
जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांची कानउघाडणी केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. काल रात्री त्यांच्यासह एकूण 34 जणांची ग्रामविकास भवनातून सुटका करण्यात आली आहे. त्यांना पुढील सात दिवस घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रभाग अधिकार्यानेच सोडली कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याची पुडी!
खारघरच्या सेक्टर 7 मध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याची पुडी महापालिकेच्या प्रभाग अधिकार्याने सोडल्यानंतर खारघरमध्ये सोशल मिडियावरून ही बातमी पसरविली गेली. त्यामुळे कोरोनाचे मळभ पनवेलहून दूर करण्याच्या प्रशासनाच्या कामावर पुन्हा संशयाचे ढग जमू लागले.
अखेर याबाबत सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी महापालिकेत खातरजमा केली असता ती शुद्ध अफवा ठरली.
त्याचे असे झाले, खारघर येथील सेक्टर 7 मधील एका सोसायटीमध्ये राहणारे गृहस्थ काल अमेरिकेहून परतले आहेत. त्यांची आज सकाळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी भेट घेतली. त्यांच्याविषयी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांना घरी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परंतु, खारघर विभागाच्या प्रभाग अधिकार्यांनी खारघरच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सऍप समूहावरून ही माहिती दिल्याने आगीसारखा बातमीने पेट घेतला आणि दाव्यासह पोस्ट व्हायरल होऊ लागली.
यावर कडू यांनी महापालिका आयुक्त देशमुख, उपायुक्त संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधून सत्य जाणून घेतले आणि संबंधितांना त्याविषयी पूर्ण सत्य माहिती पुरविल्यानंतर अनेकांनी पोस्ट काढून टाकल्या. मात्र, प्रभाग अधिकार्यांचा तोपर्यंत आततायीपणा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत होता.