खंडणी मागणारी टोळी सक्रीय
पोस्को कंपनी गेटजवळ खंडणी मागणार्याविरोधात गुन्हा दाखल
माणगाव/प्रतिनिधी
कोणताही अधिकृत हक्क नसताना विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को कंपनी गेट जवळ रस्त्यात अडवून एका सुपरवायझरच्या फोनवरुन एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला ‘तुझ्या ट्रान्स्पोर्टच्या गाड्या चालू ठेवायच्या असतील तर महिन्याला एक लाख रुपये खंडणी दे, नाहीतर तुमचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय बंद करेन’ अशी धमकी देवून खंडणी मागणार्या एका तरुणाविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माणगाव तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसीत विविध कंपन्या असून या कंपनीत विविध ठिकाणी राज्यातील व अन्य राज्यातील ट्रान्सपोर्ट वाहने सुरु आहेत. त्यामुळे विळे भागाड एमआयडीसी नेहमीच चर्चेत असतेे. या कंपनी परिसरात वाहन चालक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कोणताही अधिकृत हक्क नसताना पैशाची मागणी करुन खंडणी मागितली जाते. त्यामुळे या भागात खंडणी मागणारी टोळी सक्रिय असावी, अशी चर्चा नागरिकांतून बोलताना व्यक्त होत आहे.
याची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी मनिंदर सिग हरभजन सिंग जंनडिर (वय 37 वर्षे, रा. सानपाडा, नवी मुंबई) यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 9 ते 16 मार्च या कालावधीत विळे भागाड एमआयडीसी पोस्को कंपनीच्या गेटजवळ आदेश महाडीक (रा. भागाड) याने फिर्यादी मनिंदर सिग हरभजन सिंग जंनडिर यांचा सुपरवायझर संतोश चव्हाण याला पोस्को कंपनीच्या गेटजवळ रस्ता अडवून सुपरवायझरच्या फोनवरुन फिर्यादी यांना फोन करुन तुझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालू ठेवायच्या असतील तर महिन्याला 1 लाख रुपये खंडणी दे. तसेच फिर्यादी यांचे मित्र परमजित सिंग चाल यांना 9 मार्च रोजी फोन करुन 40 हजार रुपये खंडणी दे नाहीतर तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद करेन, अशी धमकी दिली.
याप्रकरणी मनिंदर सिग हरभजन सिंग जंनडिर यांनी माणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार माणगाव पोलिसांनी आदेश महाडीक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगावले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगले अधिक तपास करीत आहेत.