सुधागडातील रस्ते, बाजारपेठा, महामार्ग ठप्प


सुधागडातील रस्ते, बाजारपेठा, महामार्ग ठप्प  
पाली/धम्मशिल सावंत
संपूर्ण जगभरात मानवी असंहार माजविणार्‍या करोना विषाणूंना रोखण्यासाठी राज्य व देशात रविवारी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने दिलेले आदेश व सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पणाने पालन केले.  सुधागड सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या व अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रसिद्ध अशा बल्लाळेश्‍वर नगरीत कमालीचा शुकशुकाट व शांतता पहावयास मिळाली. सकाळी सात वाजलेपासून रात्री 9.00 वाजेपर्यंत सतत गजबजलेल्या बाजारपेठा मात्र आज ठप्प  झालेल्या दिसून आल्या. पाली, परळी, पेडली व जांभुळ पाडा येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एरव्ही वाहनांच्या गर्दीत हरवलेल्या   पाली खोपोली राज्य महामार्गावर देखील वाहनांची रेलचेल नव्हती. दुकाने, हॉटेल्स, बसस्थानक, शाळा, कॉलेज, शासकीय व निमशासकीय कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता. पालीत नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. मात्र रविवार असून देखील पालीतील मुख्य रस्ते मोकळे होते. बाजारपेेठेकडे नागरिकांनी पाठ फिरवली. बसस्थानकात एस टी बसेस आल्या नाहीत. त्यामुळे बस स्थानक परिसर देखील निर्मनुष्य दिसून आले. जीवनावश्यक वस्तू व साहित्य खरेदी करण्यासाठी शनिवारी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. रविवारी आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन  व अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणारे प्रशासकीय विभाग दक्ष व जागरूक राहून आपली कर्तव्ये जबाबदारी पार पाडताना दिसला. रायगड जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश देत पुरेपूर प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली जात आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात परदेशातून आलेले 418 जण प्रशासनाच्या देखरेखीत आहे. 315 जणांना त्यांच्या घरात निगराणीत ठेवण्यात आले आहे. तर 67 जणांना शासनाने अलगिकरण करून ठेवले आहे. 32 जणांचा 14 दिवसाचा अलगिकरण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. चार जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहे. यातील तिघं मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात, तर 1 जण अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहे.   
जिल्ह्यात परदेशांतून दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. यात आखाती देशातून आलेल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगराणीखाली आहेत. अलिबाग येथे 38, पनवेल येथे 164, पेण येथे 15, रोहा येथे 8, श्रीवर्धन येथे 41, माणगाव येथे 17, खालापूर येथे 14, उरण 6 म्हसळा येथे 3 जणांना त्यांच्याच घरात देखरेखीत ठेवण्यात आले आहे. तर 67 जणांना अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जीवघेण्या आजारापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशांची रायगड जिल्हा प्रशासनातर्फे कडक अंमलबजावणी सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. देवस्थाने, पर्यटनस्थळ आणि समुद्र किनार्‍यांवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. 
परमिटरूम आणि बार देखील बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम सभा समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. तहसिल कार्यालयातील सेतु केंद्रावर चालणारी सर्व कामे, प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयातील वाहन चालक परवाने देण्याचे काम, दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबचे आदेश जारी केले.


 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...