कोरोनोमुळे मासे, भाज्या महागल्या; डाळी, कडधान्यही कडाडले
पनवेल/सुरज म्हात्रे
एकीकडे सोने दोन हजाराने गडगडले असले तरी दुसरीकडे मासे महागले असल्याने खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कोरोना विषाणूचे सावट चिकन आणि मटण बाजारपेठेवर असल्याच्या हा परिणाम आहे. मच्छी बाजारातील फुगलेल्या आकड्यांमुळे शाकाहारही भाव खाऊ लागला आहे.
जगभरात कोरोनोची दहशत माजली आहे. त्यातच देशात आगडोंब पेटल्यागत त्यावर उपाययोजना करणारी सरकारी यंत्रणा कामाला जुंपली आहे. यात सोशल मीडियावरून आगीत तेल ओतले जात असल्याने संदिग्धता क्षणक्षणाला वाढत आहे. चीनमध्ये वटवाघुळापासून निर्माण झालेला कोरोनाचा व्हायरस मटण आणि चिकनमधून पसरण्याची भीती घालणारे काही फोटोशॉपवर तयार केलेले व्हिडिओ हेतुपुरस्सर पसरविले जात आहेत. त्यातून चिकन, मटणाचा मांसाहार खाणार्यांनी जिभेला लगाम घालत मटण, चिकन विक्रेत्यांचे अर्थकारण कोलमडून सोडले आहे. याचा फायदा उठवत मासे विक्रेते काही ठिकाणी कृत्रिम मासे टंचाई निर्माण करून मच्छी बाजारात खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीचा फायदा उठवत मासे चढ्या भावाने विकू लागलेत.
कोरोनोच्या भीतीमुळे सर्वत्रच व्यवहार गडगडले आहेत. दुकानदार, सराफ पेठा आणि रोजच्या गर्दीच्या बाजारपेठा ओस पडू लागल्याने सराफांनी कधी नव्हे तो सोन्याचा तोळ्यामागे तब्बल दोन हजारांनी भाव कमी केला आहे. सोने स्वस्त झाल्याने तरी ग्राहक घराबाहेर पडून पेढ्यांवर येतील, अशी त्यांची अटकळ आहे, आता त्याला कितीसा प्रतिसाद मिळतो ते दिसेलच.
पण मासे महाग झाल्याने काहींनी नाक मुरडत शाकाहाराची आरोळी ठोकत भाजी मार्केटची वाट धरली तर तिथेही भाजीपाला आधीच रुसून बसला आहे. वाट्टेल त्या किंमतीला भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यातच कडधान्य किंमतीने आपसूकच फुगल्याने कोरोनाची दहशत कशी पसरली याचा वेगळा अनुभव बाजारपेठेत मिळत आहे.
पापलेट, हलवा, सुरमई बाराशे रुपयांच्या वर गेली आहे. त्यात पापलेट आकाराप्रमाणे दोन हजार रुपयांच्या घरात गेला आहे. कोलंबी पाचशेवरून सातशेवर पोहचली आहे. जिताडा, घोल, वास घेऊन पोट भरण्याची अवस्था आहे. बोंबिल, कावेरी, वाकट्या, बाकस, ढोमी, वामही स्वस्त राहिले नाहीत. चिंबोरी आकाराप्रमाणे नगावर किंवा पंधराशे रुपये किलोने इतर माशांचे पाय खेचून पुढे धावत आहे.
मटण, चिकन खाण्याची नुसती भीती वाटत असल्याने मासे खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीने हे आपोआप भाव वाढले आहेत.
दुसरीकडे कोथिंबिरीच्या जुडीपासून शेपुची जुडी आणि मेथीपासून शेवग्याच्या शेंगांचे वाढते भाव हात पाय पसरू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी कांद्याने गृहिणी रडकुंडीला आल्या होत्या, आता शाकाहार आणि मांसाहारचे वाढते भाव पाहून त्या मेटाकुटीला आल्या आहेत. भाजीपाला आणि कडधान्यही भाव खाऊ लागल्याने कोरोनोने आता किचनवर विपरित परिणाम केल्याचे दिसत आहे.