उरणमध्ये ’जनता कर्फ्यू‘ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण/दिनेश पवार
कोरोनाची संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युला उरण तालुक्यातील जनतेने रविवारी उत्स्फूर्तपणे उदंड प्रतिसाद दिला. रविवारी सकाळपासूनच सदैव रहदारी असणारे रस्तेच काय गावोगावच्या गल्ल्याही सुनसान झाल्या होत्या. सर्व जनता आपापल्या घरात दारे खिडक्या बंद करून बसले होते. जनतेच्या या उदंड प्रतिसादाला पोलिस यंत्रणेनीही दाद दिली.
सार्या जगावर कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. जागतिक महामारीचे हे संकट दूर करण्यासाठी विविध देशांतील वैज्ञानिक संस्था कामाला लागली असताना देशात या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेलाच एक दिवस कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार समस्त देशातील जनतेने रविवारी एक दिवस कर्फ्यू पाळण्याचे निश्चित केले. रविवार सकाळपासूनच उरण तालुक्यातील वाहतूक तसेच नागरिकांचा रस्त्यावरील वावर पूर्णतः बंद झाला. तालुक्यातील उरण-पनवेल मार्ग, गव्हाणफाटा-चिरनेर मार्ग, चिरनेर-खारपाडा मार्ग, जेएनपीटी-कळंबोली महामार्ग, कोप्रोली-उरण मार्ग आदी रस्त्यांवर पोलिस वाहन व रुग्णवाहिका व्यतिरिक्त एकही वाहन धावताना दिसत नव्हते. नेहमी गजबजलेले असणारे कोप्रोली व चिरनेरचे नाके आज सामसुम झाले होते. इतकेच नव्हे तर गावोगाच्या रस्त्यांवर एकही व्यक्ती वावरताना दिसत नव्हती. बहुतेक जनतेने आपापल्या घराची दारे खिडक्या बंद करून स्वतःला घरात कोंडून घेतले होते. जनतेच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाला पोलिस यंत्रणेनेही सॅल्युट केला आहे.