बचावाकरीता एक महिन्याची मुदतवाढ मिळण्यासाठी नगरसेवक बहिरांचा आटापिटा
महापालिका आयुक्तांकडे विधी विभागाने सरकवले पत्र
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे वादग्रस्त भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांनी बचावाकरीता वकील देण्यात येणार असल्याने एक महिन्याची मुदत मिळावी, असे बचात्मक धोरण आखून पनवेल महापालिकेकडे मुदत वाढवून मागितली आहे. महापालिकेला त्यांनी तसे काल लेखी कळविले आहे.
10 मार्चला लॉकडाऊन काळात कर्तव्याचे भान विसरून स्वतःच्या वाढदिवसाची जोरदार ओली पार्टी झोडल्याने प्रभाग 20 चे भाजपाचे नगरसेवक अजय बहिरा अडचणीत आले आहेत. शहर पोलिसांनी त्यांना ओली पार्टी झोडताना रंगेहाथ पकडून साथीरोग कायदा, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात पाठविले होते.
त्यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे गैर आणि असभ्यवर्तन तसेच लोकप्रतिनिधीने कर्तव्यात कसून केल्याने बहिरा यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्याची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविण्यात आली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे कोकण विभागीय विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धराम सेलीमठ यांनी याविषयी आयुक्तांना कारवाई करून अहवाल सादर करण्यासाठीचे पत्र आयुक्तांना पाठविले होते.
त्यानुसार देशमुख यांनी बहिरा यांना पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसमध्ये देशमुख यांनी 7 दिवसांची मुदत दिली होती. सात दिवसांच्या आत खुलासा न केल्यास आपल्याला काहीही सांगायचे नाही, असे समजून अपात्र ठरविण्यासाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येईल, असे बजावले होते.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पारित जरी झाला आणि तो गैर वाटल्यास ठराव खंडित करण्याचा अधिकार आयुक्तांना असल्याने बहिरा यांचे राजकीय भवितव्य अधांतरी आहे. त्याशिवाय तो ठराव राज्य शासनाकडे पाठवून बहिरा यांना अपात्रसुद्धा ठरवता येऊ शकते, असा कायदा असल्याने बहिरा चांगल्याच अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन काळात वकीलांचे कार्यालय बंद असल्याने आपली बाजू मांडण्यासाठी वकील शोधकार्य सुरू आहे. त्याकरीता एक महिन्याची मुदत वाढवून मिळावी, असा युक्तीवाद करणारा अर्ज देशमुख यांना बहिरा यांनी दिला आहे.
विधी विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर यांनी आयुक्तांपुढे पुढील कार्यवाहीसाठी ते पत्र ठेवले असून आयुक्तांच्या शेर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.