कोविड योद्ध्यांप्रमाणे महावितरणच्या कर्मचार्यांना 1 कोटीचा विमा देण्याची संघर्ष समितीची मागणी
पनवेल/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाविरूद्ध लढणार्या योद्ध्यांमध्ये महावितर विभागाचाही सिंहाचा वाटा असल्याने त्यांनाही कोरोना संसर्गाचा तितकाच धोका आहे. महावितरणमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकारी, कुशल-अकुशल कामगार आणि ठेकेदारांनाही 1 कोटी रूपयांच्या विम्याचे संरक्षण द्यावे तसेच कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू ओढावल्यास त्यांना पोलिस, डॉक्टरांप्रमाणे देण्यात येणारी आर्थिक मदतही घोषित करण्यात यावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि प्रधान सचिव तथा व्यवस्थापकीय संचालक असिमकुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे.
राज्यात कोरोनाविरूद्ध लढाई तीव्र बनत चालली असताना संसर्गही तितक्याच प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत महावितरणचे कर्मचारीही कोविड योद्ध्याप्रमाणे लढत आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने वीजेचा वापर वाढला आहे. त्यात संचारबंदी, लॉकडाउन असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास लोकं घराबाहेर पडू शकतात. याची खबरदारी घेऊन महावितरणचे कर्मचारी, अधिकारी ती वेळ येऊ नये म्हणून दिवसरात्र डॉक्टर, पोलिसांप्रमाणे वेगळ्या स्तरावर झटत आहेत.
त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोका संभावतो. त्यांच्या आरोग्याची आणि कुटूंबाची काळजी घेण्यासाठी शासनाने अद्याप कोणतेच पाऊल उचलले नाही. आपण अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्रातील उर्जा खाते, महावितरणच्या सर्व घटकांना विम्याचे संरक्षण आणि कोरोनामुळे मृत्यू ओढावल्यास देण्यात येणारी धनराशी ठरवून त्याची घोषणा करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
राज्य सरकार, प्रधान सचिव तथा व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यातून कर्मचारी, अधिकार्यांना उर्जा मिळू शकते असा दावा कांतीलाल कडू यांनी केला आहे.