रायगडात ३५०० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप


रायगडात ३५०० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप 
अन्न नागरी पुरवठा विभागाच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपायोजना 
अलिबाग/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. पाच दिवसात रायगड जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ८८७ शिधापत्रिका धारकांना तब्बल ३ हजार ५३८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १८.५२ लाख आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार २३२ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.
रायगड जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे १ हजार २९२ क्विंटल गहू, २ हजार २४६ क्विंटल तांदूळ, तर २४४ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २ हजार ५९८ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे . त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ ५ एप्रिलपासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम, कळंबोलीकडून प्राप्त करून घेतले जात आहे.



जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...