…तर उद्धव ठाकरे पुन्हा शपथ घेतील!



…तर उद्धव ठाकरे पुन्हा शपथ घेतील; छगन भुजबळ यांनी सांगितला दुसरा पर्याय


राज्य अस्थिर करणं योग्य होणार नाही!





राज्य सध्या करोनाचा मुकाबला करत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रंणा राबत असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते की काय याविषयीची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुसरा एक पर्याय सुचवला आहे.


करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. या संवादादरम्यान भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेवरील नियुक्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी भूमिका मांडली. “उद्धव ठाकरे यांची नियुक्ती राज्यपालांनी करायला हवी, असं आम्हाला वाटतं. कारण तसा ठरावं मंत्रिमंडळानं केला आहे. मंत्रिमंडळानं केलेल्या ठरावावर राज्यपालांनी कार्यवाही करणं बंधनकारक आहे. राज्यपाल कोट्यातील जागा कला, साहित्य आदी क्षेत्रातील लोकांसाठी असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या निकषातही उद्धव ठाकरे बसतात. उद्धव ठाकरे स्वतः मोठे छायाचित्रकार आहेत. सामनाचे संपादक होते. पण, करोनाच्या लढाईत सरकार गुंतले असताना अशा रीतीनं राज्य अस्थिर करणं योग्य होणार नाही. त्यामुळे मला खात्री आहे की, राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील,” असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.


उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुसरा पर्याय काय?


याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले,” राज्यपालांकडून असा निर्णय घेण्यात आला नाही. तर दुसरा मार्ग हाच आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. परत आम्ही त्यांना आमचा नेता म्हणून निवडू. परत सगळं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि आपलं काम सुरू करेलं. पण, ही वेळ येऊ नये म्हणून राज्यपालांनी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं,” अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...