खासगी डॉक्टरांचीही हवी ‘साथ’
बोरघर/प्रतिनिधी
कोरोना मुक्तीची लढाई ही समस्त मानव जातीच्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून ही लढाई आता केवळ शासनाची लढाई नसून आपल्या सर्वांची आहे. किंबहुना समाजातील सर्व घटकांची लढाई आहे. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करून ही कोरोना विरोधातील मानवी अस्तित्वाची लढाई आपल्याला सर्वार्थाने जिंकण्यासाठी आपल्याकडे अस्तित्वात असलेले सरकारी डॉक्टर्स व वैद्यकीय यंत्रणा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रमाणामुळे कमी पडू नये म्हणून या लढाईत शासनाला देशातील सर्व प्रकारच्या खासगी डॉक्टरांच्या सहकार्याची गरज आहे.
कोरोना व्हायरस या महाभयंकर संसर्गजन्य महामारीने सध्या वैश्विक स्वरूप धारण केले आहे. जगातील २०० हून अधिक देशांत कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. या महामारीच्या वाढत्या संक्रमणकारी संसर्गामुळे संपूर्ण जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फैलाव रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जगभरातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका व सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणा आणि शासन-प्रशासनाकडून सर्वत्तोपरी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी हे सर्व घटक अहोरात्र कंबर कसून काम करत आहेत. शासनाने कोरोना विषाणूची संक्रमण साखळी रोखण्यासाठी संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले असून त्या अनुषंगाने शासनाची कोरोना मुक्तीची लढाई सुरू आहे.
शासनाने नागरिकांनाही कोरोनाच्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचा विश्वास दिला आहे. शासकीय, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात आहेत. सोबतच खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालये सरकारला मदत करत आहेत. पण काही डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयं या कोरोना मुक्तीच्या लढाई पासून अलिप्त राहून भूमिगत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ओपीडीमध्ये येणार्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी सुद्धा शासनाकडे येत आहेत. खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सध्या ही मोठी आणीबाणीची परिस्थिती देशावर आलेली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत समाजातील सर्व घटक देशासमोरील या संकटाला सामोरं जात असतानाच आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी मात्र रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
एकंदर परिस्थिती पाहता या क्षेत्रात काम करणार्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणार्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यायला हवी कारण ही मानवी अस्तित्वाची लढाई आहे.
खासगी रुग्णालयात येणार्या रुग्णांमध्ये जर कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात लक्षणे आढळल्यास आपण आपल्या परिसरातील शासकीय आरोग्य अधिकार्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी, असेही त्यांना शासनाकडून सांगण्यात आले आहे.
खासगी डॉक्टरच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीच्या या राष्ट्रीय लढाईत कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करून त्याचा नायनाट करण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या महाभयंकर मगरमिठीतून मानवी अस्तित्व मुक्त करून ते अबाधित ठेवण्यासाठी देशातील सर्व खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवार्थ योगदानाची आणि नागरिकांच्या सहकार्याची आज आपल्या देशाला किंबहुना शासनाला नितांत गरज आहे.
कोरोना विषाणू विरूद्ध मानवी अस्तित्वाची ही लढाई जिंकण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाला अपेक्षित देशातील खासगी डॉक्टरांचे वैद्यकीय सेवा सहकार्य आणि योगदानाची आणि नागरिकांच्या सहकार्याची देशाला गरज आहे. आपल्या सहकार्यामुळे कोरोनामुक्तीची ही लढाई आपण जिंकून कोरोनावर विजय संपादन करणार, यात तीळमात्र शंका नाही.