जासई, खांदा कॉलनीने कोरोनाचे खाते उघडले
पनवेल, कामोठे, खारघरमध्ये प्रत्येकी एकने वाढ
पनवेल/प्रतिनिधी
ओला चालकाच्या संपर्कात आलेल्या तिघांना याआधीच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता त्याच्या पत्नीचाही नंबर लागला आहे. त्यामुळे पनवेल शहरातील आणखी एका रूग्णाची वाढ झाली. जासई रेल्वे स्टेशन आणि खांदा कॉलनीत दोन्ही ठिकाणी नवे रूग्ण आढळले आहेत. तर कामोठे आणि खारघरमध्ये प्रत्येकी एका रूग्णाची वाढ झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी आणि खारघर येथील चार नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. तर जासई रेल्वे स्टेशनमधील एका रेल्वे कर्मचार्याला कोरोना झाला आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल तक्का येथील रेशन दुकानदारासह अन्य चार व श्रीवर्धनमधील एकासह सहा जणांना कोरोना झाल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आज महापालिका क्षेत्रात चार आणि उरण तालुक्यातील जासई रेल्वे स्टेशनमधील एकाला कोरोना झाला आहे.
खांदा कॉलनीतील रूग्ण अष्टविनायकमध्ये उपचारासाठी गेला होता. त्याची कोरोना टेस्ट केल्याने ती पॉझिटिव्ह आली. कामोठे येथील रूग्णावर तेथील हांडे रूग्णालयात उपचार सुरू असताना तपासणीअंती तोसुद्धा कोरोनाबाधित निघाला. पनवेल शहरातील ओला चालकाच्या पत्नीला कोरोनाने ग्रासले आहे. खारघमधील रूग्णसुद्धा एका खासगी रूग्णालयात उपचार घेताना कोरोनाबाधित ठरला आहे. जासई येथील रेल्वे कामगार भायखळा येथे उपचार घेत असताना त्याला कोरोनाने घेरले आहे. त्यामुळे आता पनवेल आणि रायगड़चा आकडा 43 वर गेला आहे.