लोकोहो, बाजारात
जत्रेसारखी गर्दी करू नका!
..................................
- कांतीलाल कडू
...................................
बाजारपेठा सुरू करण्याचा राज्य शासनाचा आणि स्थानिक प्रशासनाचा निर्णय खुप महत्वाचा आहे. लॉकडाऊनमध्ये घरात कोंडमारा झाल्याने अनेकांना मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडणं तसे जिकरीचे आहे. पण समोर पावसाळा आहे. आधीच पन्नास दिवसात अनेकांचे खाण्यपिण्याचे आबाळ झाले आहेत. लॉकडाऊनबद्दलही मतमतांतरे आहेत. तरीही जीवनावश्यक वस्तूंसोबत अन्य काही वस्तुही मानवी जीवनाचा कळत न कळत एक भाग बनल्याने त्या वस्तूंचीही आवश्यकता व्यापक बनत चालली आहे. घरात बसून पंख्याची हवा खात असताना पंखेही दिवस रात्र चालून बंद पडू लागले आहेत. वातानुकूलित यंत्रणा असेल, घरातील कुकर, मिक्सर ही इलेक्ट्रिक उपकरणे घरोघरी बंद पडल्याने महिलांच्या नाकी नऊ आले आहे.
शाळा सुरू होतील तेव्हा होतील, मात्र ऑन लाईन शिकवण्या सुरू झाल्याने अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके खरेदी केली पाहिजेत. नवीन कोऱ्या वह्या आणि पुस्तकांचे आकर्षण आणि तितकाच हट्ट मुलांचा असतो. बाप कितीही गरीब असला, अगदी बनियनला भोकं पडली तरी तो वापरेल. तो स्वतःसाठी सगळ्या तडजोडी करेल जीवनात. पण, मुलांसाठी तो मागे हटत नाही, कोणत्याही वळणावर. बापाचे काळीजच वेगळं असते. त्यामुळे त्यालाही वाटतं, मुलांसाठी नवी पुस्तके, वह्या, कपडे, शालेय साहित्य आणले पाहिजे आणि तेवढ्यासाठी बाजारपेठा उघडल्या गेल्या पाहिजेत.
शेतकरी आभाळाला डोळे लावून राहिला आहे. पाऊस पडेल तेव्हा पडू दे. तयारी आधीपासून करण्यात कसूर नको. शेतीच्या अवजारापासून बी-बियाणे सगळी व्यवस्था चोख ठेवायला हवी. लॉकडाऊनमध्ये जनावरांसाठी चारा, पेंड नाही मिळाली. त्या व्यवस्थेसाठी दुकाने उघडली गेली तर घरच्या लेकरांसह शेती आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न मोकळा होईल, म्हणून बाजारपेठा सुरू व्ह्ययला हव्यात.
सरकारने हे लक्षात घेऊन आणि घरात बसून बसून सैल होत चाललेली मानसिकता थोडी सकारात्मकतेकडे झुकावी म्हणूण क्षणभर का होईना, हा विरंगुळा ठरण्यासाठी ही मोकळीक दिली आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत जत्रेसारखी गर्दी करून लॉकडाऊनचा मुडदा पाडू नका. ते परवडणारे नाही.
कोरोना सगळीकडे दबा धरून बसला आहे. तो इतक्या लवकर काही निरोप घेईल असे वाटत नाही. जनजीवन विस्कळीत करणे इतकाच हेतू कोरोनाचा नसून जनजीवन उखडून टाकण्याची कोरोनाची ताकद आहे. त्याला बळी न पडता हे सगळे सावधपणे निभावून नेण्याची जबाबदारी आपली आहे.
गुजरातच्या सुरतमध्ये उसळलेली गर्दी काबूत आणण्यासाठी तेथील पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांना लाठीमार करावा लागला. आपल्याकडे अद्याप तसे काही करण्याची गरज पडली नाही. गर्दी नेहमीचीच आहे. ती अद्याप हवी तशी आटोक्यात आलेली नाही. कोरोना अंगणात आला आहे, तरी 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती', म्हणत आम्ही किती शूर आहोत हे दाखवण्यासाठी घराबाहेर पडत आहोत. डॉक्टर, पोलिस, प्रशासनाने डोकं आपटायचे बाकी ठेवले आहे. तरीही आमच्या गरजा आकुंचन पावत नाहीत आणि आम्ही घरात राहण्यास अजिबात बांधील नाहीत असेच सगळे उपटसुंभ वागत आहोत.
कोरोना आता वेगळ्या टप्प्यावर आला आहे. त्याने शिकार हुडकून काढल्यानंतर आता आपोआप त्याच्या जाळ्यात अडकत चालली आहेत लोकं. त्यांना कितीही आडवा, त्यांची बाहेर पडण्याची हौस म्हणा, गरज म्हणा किंवा खाज म्हणा, ती काही केल्या पूर्ण होत नाही. त्यात समोर पावसाळा येत असल्याने सरकारने दूरदृष्टीने काही दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कायमस्वरूपी बंदी हा काही लॉकडाऊनवर उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे भूकबळींची मोठी संख्या उभी राहील. अनेक कंगोरे आहेत, दुकाने सुरू करण्यामागे. त्याचा खरंच सदुपयोग व्हावा, ही भावना स्थानिक प्रशासनाची आहे.आपण गर्दी करतो, नियम तोडतो आणि प्रशासनाला वाकुल्या दाखवतो म्हणूनच लॉकडाऊनच्या तारखा पुढे वाढत आहेत. सरकारला कोरोनापेक्षा आपल्या नाठाळपणाची भीती जास्त सतावत असल्याने त्यांनी ही बंधने घातली आहेत.
गर्दीची हमखास ठिकाणे असलेली मंदिरे याच कारणास्तव प्रारंभीच बंद केली. खरेदीपेक्षा गार हवेसाठी मॉल्स, सिनेमागृहात रेंगाळणारे रोमिओ पाहून ती बंद केली. नाही तर तिकडची जत्रा कधीच संपली नसती. जोपर्यंत, कोरोना होणार नाही, असे देवाची मूर्ती लिहून देत नाही, तोपर्यंत त्याच्या चरणांवर टेकलेला माथाच भक्तांनी उचलला नसता. सिनेमागृहात बसून एकाच सिनेमाचे पारयण करणारे रसिकही कमी नाहीत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अनुभवायला मिळतात. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच ऊत आला आहे. अशात आपल्या हिताचे आहे ते टिपून घ्यावे, नको असलेले त्याज्य ठरविणे आपल्या हाती आहे. उगीच गर्दी करून पोलिस आणि प्रशासनाचे काम न वाढविणे यात शहाणपणा आहे.