संकट सरकारच्या उशाशी !

विशेष संपादकीय
............................
संकट सरकारच्या उशाशी !
.................................
- कांतीलाल कडू, संपादक दै. निर्भीड लेख
....................................................
कोरोनाच्या निमित्ताची ढाल करून राज्य सरकार बरखास्तीचे ढोल गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा नेते विशिष्ट व्युहरचना करून वाजवत आहेत. सरकार बरखास्त होईल, केंद्रातील सरकार हा निर्णय घोषित करेल, राष्ट्रपती राजवट लागेल या सध्या जर तरच्या शक्यता आहेत. परंतु, राज्य सरकारला कधीही पायउतार व्हावे लागेल अशा वातावरणाचे काळे ढग निर्माण करण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत.
आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून त्यांना खिंडीत पकडले होते. त्यावरून सरकार कोसळले असते तर भाजपाचा पाय अधिक खोलात गेला असता, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाची खणा नारळाने ओटी भरून दान ठाकरे सरकारच्या पदरात टाकले. त्यात भाजपाने त्यांच्या शेताचीही मशागत करून मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंचे विषारी वाटणारे तृण अलगद उखडून बाहेर फेकून दिले.
पहिला अध्याय संपला. आता कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे, ही कढी पिकवत विरोधी पक्ष नेते उगीचच ऊर फाडून बोंबलत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी 'मेरा अंगण, मेरा रणांगण', असा शब्दछळ करत महाराष्ट्र वेठीस धरला. तो प्रयोग त्यांच्यावर उलटला. सत्ता असताना ज्या मीडियाच्या गळ्यात पट्टा बांधून त्यांना 'मुख्यमंत्री दारीचे श्वान' बनवले होते, ती पाळीव मीडियासुद्धा फडणविसांच्या मदतीला फार आली नाही. सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो, तेव्हा पाळीव मीडिया पहिल्यांदा उंदरांसारखी पळत सुटते.
गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता राज्य सरकार बरखास्त करायला पूरक, सक्षम, संयुक्तिक वाटणारी कारणे केंद्र सरकारच्या हाती अजून तरी आलेली नाहीत. पण, तरीही सरकार पाडण्याची तयारी सुरू ठेवली की, प्रतिस्पर्धी गटाला धक्के बसत असतात. उद्धव ठाकरे सरकारला ते धक्के बसले आहेत, बसत आहेत. केंद्रातून त्या हालचाली सुरू आहेत आणि राज्यात त्याचा कट शिजला आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते, राजकीय भूकंपतज्ज्ञ शरद पवार आपल्या पलंगावरुन खाली उतरून चालायला लागणार नाहीत. ते चालत नाहीत तर उद्धव, देवेंद्रापेक्षा अधिक जोराने धावत आहेत. जेव्हा पवार धावायला लागतात तेव्हा संकट उशाशी आहे, याची खूणगाठ बांधली जाते. हा आतापर्यंतचा राज्यातील इतिहास आहे.
भाजपाचे केंद्रातील काही मंत्री, माजी मंत्री कोरोनावरून उद्धव ठाकरे यांचे लक्ष विचलित करून सरकार कसे अपयशी ठरले आहे आणि त्यांनी राजीनामा दिला पहिजे याची जाहिरातबाजी करून पक्ष कार्यकर्त्यांना कोचिंग क्लास सुरू केले आहेत. त्यांनी बडवल्याप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही सरकारवर कोरोनाचे खापर फोडले आहे.
काल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोश्यारी यांना भेटून सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. देवेंद्र, चंपा, गणपा असे डझनभर नेते सकाळी उठले की, चहा घ्यायला राजभवनावर जातात.
महाराष्ट्रात सरकारविरोधी चीड उत्पन्न करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांना अद्याप यश येताना दिसत नाही. सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपा नेते जेवढे प्रयत्न करतात त्याच्या दहा टक्के जरी कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न राज्यात केले असते तर ओशाळत उद्धव ठाकरे यांनीच राजीनामा दिला असता. तसे काही महाराष्ट्रात होताना दिसत नाही, पण सरकारवर केंद्र शासनाचा प्रचंड दबाव एकीकडे वाढत आहे आणि दुसरीकडे सरकारला खिळखिळे करण्यासाठी भाजपातील सगळे कवठ्या महाकाळ अंगात संचारल्यासारखे राजभवनात जावून भुतांसारखे सरकारविरोधात बरळत आहेत.
महाराष्ट्र पुन्हा अडचणीत आला आहे, राजकीय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, अगदी हातावर पोट भरणारा रिक्षाचालक, मजूरापासून ते नऊ ते पाच पर्यंत ड्युटी करत रेल्वेतून धक्के खात, घामाटलेला वास फुफ्फुसात घेत मर मर मरणारा मध्यमवर्गीयसुद्धा आर्थिक आणीबाणीत सापडला आहे. त्याला कोरोना श्वास घेऊ देत नाही. त्याचा गैरफायदा घेत राज्यातील विरोधी पक्ष सरकारला तोंड दाबून बुक्क्याचा मार देत आहे. ही परिस्थिती लक्षात आल्यानेच शरद पवार रात्री मातोश्रीवर गेले होते. ते उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांचे मातोश्रीवर जाणे कदचित मीडियासाठी ब्रेकिंग न्युज असली तरी त्या भेटीतून अफजलखानाचा कोथळा कसा काढायचा याची बीजं पेरली गेलीत एवढे निश्चित. सरकारविरोधी कट कसा रचला जातो, याचे ज्ञान पवारांपेक्षा मोदींना नाही. पवारांनी ते पुलोदच्या प्रयोगात अनुभवले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी पवार यांचे सरकार बरखास्त केले होते.
आता काहीही कारणे शोधून यंदाच्या दिवाळीचे फटाके मातोश्रीवर फुटणार नाहीत, याची दक्षता केंद्र सरकारने घेतली आहे. ते उद्धव सरकारला काहीही करून वर्षपूर्ती करू द्यायची नाही, त्याच्या आताच विसर्जन करायचे असे मनाशी पक्के ठरवलेले दिसते. त्याशिवाय भाजपा नेते मनोरूग्णासारखे वागणार नाहीत. पनवेलला तर डोक्याचे सोडून कमरेला गुंडाळून भाजपाच्या काही नगरसेवकांनी चार वर्षांपूवीच्या निवडणुकीचे फोटो सोशल मीडियावर पसरवले आहेत. घटना काय याचे त्यांना गांभीर्य नाही असे नाही. एकदा भुतांसारखे वागायचे ठरवले की नंगा होणे अधिक सोपे होते. तोच प्रकार सगळीकडे भाजपाने सुरू ठेवला आहे.
सरकार किंवा उद्धवसेना तशी फार आक्रमक अद्याप झाली नाही. भाजपाला ट्रोल म्हणण्यापेक्षा ते टरबूजापलीकडे वैचारिकरित्याही विरोध करताना दिसत नाहीत. अर्थात हा त्यांचा गुणही शांतरस निर्माण करतो ते एका अर्थाने बरे आहे. पण, विरोधकांच्या हाका म्हणण्यापेक्षा त्यांची अलगद पडणारी पावले लक्षपूर्वक पाहिली पाहिजेत. नुसतेच ते हंगामा करणार असतील असे नाही. काहीही करून तीन पायाची सर्कस पाडायची असे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी मोदींनी त्यांना आत्मनिर्भर केले आहे. तो संदेश त्यांचा फक्त भाजपा नेत्यांसाठी होता. त्याप्रमाणे सगळे सुरू आहे.
सुरुवातीला परप्रांतीय मजुरांच्या नथीतून सरकारला कोंडीत पकडले, उद्धव यांनी अंग आवळून घेतल्याने मोदी, गोयल, योगी यांच्या मगरमिठीतून ते निसटले. आता नवे फास फेकल्याने सरकारचा धोका वाढला आहे. हे समजून सांगण्यासाठी काल मातोश्री भेटीचा पवार यांचा बेत होता.
राज्यात कोरोनापेक्षा वेगळं काही तरी घडू शकते. अगदी आत्महत्या घडवल्या जाऊ शकतात. भूकबळी दिले जाऊ शकतात. हत्या सत्र घडू शकते. सरकार बरखास्त करण्यासाठी थंड डोक्याने कट शिजत आहे. याचा पूर्ण अंदाज बांधून उद्धव यांना कालच्या बैठकीतून पवारांनी गीता सांगितली असणार.. त्यांनी हे सुद्धा सांगितले असेल की, मी जेव्हा सांगेन तेव्हाच रथावरून उतरायचे... आधी तु उतरलास की, मगच मी रथ सोडेन. तेव्हा काळजी करू नकोस, हा मंत्र त्यांनी दिला असेल.
आणखी एक घटना महत्वाची आहे, राज्यपालांना दे धरणी ठाय करणारे खा. संजय राऊत राजभवनावर गेले तेव्हा कमरेतून धनुष्यबाणासारखे वाकले होते.
उडवाच खुशाल मान माझी
तक्रार करणार नाही
शर्थ इतुकीच आहे की
मान झुकवणार नाही..!
अशा बाण्याचा कोलमडलेला सामनाही राजभवनात बघायला मिळाला याचाच अर्थ फार मोठे राजकीय अरिष्ट मातोश्रीच्या उशाशी घोंगावत आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...