कोरोनाचा समुळ नाश
करणारी महासंजीवनी!
.............................
-कांतीलाल कडू, संपादकः दै. निर्भीड लेख
.............................
संकटं कधी एकटीदुकटी येत नाहीत. ती आली की, झुंडीच्या झुंडीने येतात. कोरोनाचे वैश्विक अरिष्ट आले, त्याने सारेच देश कोलमडून गेले आहेत. लॉकडाऊन ही त्यावरची प्राथमिक उपचारता आहे. आयुषने दिलेले औषधही रोग मुळासहित उखडून टाकणारे नाही, पण सगळे जण अगदी संजीवनी हाती लागल्यासारखे निर्धास्त आहेत. त्याच्या वाटपाचे उत्सव सुरू झाले आहेत. एखाद्याला जीवदान देत आहोत, अशा आविर्भावात ते दिले जात आहे. आपणही अंधपणे विश्वास ठेवून आता आपल्याला काहीच होणार नाही, असे वावरत आहोत. हा आततायीपणाच कोरोनाचा निमंत्रक आहे.
मुळात, आपल्या देशात 32 प्रकारच्या संजीवनी आहेत. त्याचा अभ्यास असलेले हिमालयात बसले आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचा काय उपयोग असा सहज प्रश्न पडू शकतो. औषध उपलब्ध असताना, ते हजारो कोसो दूर असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण सर्वांत महत्वाचे जे औषध आपल्याकडे आहे, हातात आहे, ते सोडून गावभर धिंडोरा करण्यात आपण व्यस्त आहोत. मग फसगत तर होणारच आहे.
कोरोनाच्या भयानक परिस्थितीचा फायदा अनेकांनी उचलला आहे. कुणी भविष्याच्या राजकारणासाठी त्याचा वापर सुरू केला आहे, कुणी पोटाची खळगी भरण्याच्या नावाने तिजोरी भरण्याकरिता केला आहे तर काहींनी अतिशय भावनिक होत काट्याने काटा काढत जर्जर केले आहे. परिस्थिती फार भयानक असताना, आपण आंधळे का होत चाललो आहोत, हे कळत नाही.
कोणताही आजार असो, रोग असो, आधीव्याधी असोत. शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे, मनाचे सामर्थ्य भक्कम करणे, परिस्थितीच्या लाटांवर स्वार होत समुद्राची ताकद अंगिकारणे, संकाटात स्वतः असताना आभाळाच्या मायेने इतरांचा आधार होणे ही सर्वांत मोठी संजीवनी तुमच्या मनाच्या गाभार्यात ़टवटवीतपणे फुललेली असताना, उगीच बाहेरच्या औषधांच्या मागे का लागता तेच कळत नाही.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता सरेल. पाचवा, सहावा लागेल. खरं तर पावसाळा संपेपर्यंत कोरोनाचा मुक्काम आपल्या देशातून संपुष्टात येईल हे शक्य नाही. पावसाळ्यात तो अधिक तीव्रतेने थैमान घालेल. कोरोना कसा मानवी शरीरावर त्याचे जाळे फेकते याची अख्यायिका आपण रूग्ण, डॉक्टरांकडून ऐकत आहोत. आता पावसाळ्यात कोरोनाचे पूवर्ज असलेले डेंग्यू,मलेरिया, काविळ, विचित्र तापाचे प्रकारही त्याच्या भेटीला वंशपरंपरेने येणार आहेत. तेव्हा कोरोनाच्या श्वासात त्यांची नाळ गुंफलेली असल्याने मृत्यूदर वाढेल. याचाच अर्थ कोरोेना पावसाळ्यात अधिक फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा दुसराही अर्थ असा आहे की, राज्य अथवा केंद्र सरकार पावसाळ्यापूर्वी लॉकडाऊनचे भूत मानवी मनावरून उतरवू शकणार नाही.
आता आपल्यालाच अधिक सामर्थ्यवान व्हायला हवे. ते आपल्या हाती आहे. आपण ते करू शकता. आत्मनिर्भर, आत्मविश्वास हे मराठी शब्दकोषातील अवघड वळणावरचे शब्द बाजूला ठेवून द्या. अगदी हळदी-दुधापासून, मिठाच्या गुळण्या, दालचिनी, गवतीचहा, जिरे, तमालपत्र याचे काढे, गुळाचा चहा, अगदी शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणारे पोषक, सकस आहार वेळेवर घेणे, किमान आठ तास झोप घेणे, घरातल्या घरात व्यायाम, चिंतामुक्त जगणं हे सर्वांत गुणकारी औषध असताना, उगीच नको ते उपाय करून सुक्या गांडीवर बिब्बे लावण्याचा प्रकार सगळीकडे सुरू आहे.
माणूस उशाला विषाची टाकी घेऊनच जगत आहे. ती टाकी म्हणजे घरातील फ्रिज आहे. फ्रिजमध्ये थंडगार झालेल्या पदार्थाचे सेवन हे मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी करते. शिवाय फ्रीजच्या मागील बाजूस असलेले भांडे आपण सहज दुर्लक्षित करतो. त्यात साचलेल्या पाण्यात मलेरिया, डेंग्यूचे डास वाढवत असतो अतिशय लडिवाळपणे. ते भांडे स्वच्छ करण्याचे भान नसते असे नाही. तरीही दूर्लक्ष करतो आपण सारे. इतके आत्मनिर्भर झालो आहोत. तेच अंगलट येतं आणि कोरोनाची शिकार बनत आहोत.
हॉस्पिटल आहेत, तिथे उपचार होतील. परंतु, औषध उपचारांना शरीर साथ देते तेव्हाच उपचार होतात. शरीर जर पोखरलेले असेल तर कितीही ऍन्टीबायोटिक्सचा मारा केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. याचा अर्थ हॉस्पीटलला जाऊ नये असे नाही. तर शरीरातील रोग प्रतिकार शक्ती ही औषधाने वाढविण्यापेक्षा ती मनातील सामर्थ्य, व्यायाम, सकस अन्न आणि ताणतणाव मुक्तीच्या बळावर वाढविणे आपल्याच हाती आहे.
आज, दररोज कोरोनाचा अहवाल पाहत असताना, हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यांना इतर आजार असल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती रोडावते होते आणि कोरोना झडप घालतो. हे जितके खरे आहे तितकेच हेसुद्धा सत्य आहे की, औषधे, डोस, विविध प्रकारच्या इंजेक्शनमुळे मानवी शरीरावर ताण, स्ट्रेस वाढतो आणि त्याचा विपरित परिणाम होऊन कोरोना अलगद शरीरात शिरकाव करतो. यातून वाचण्यासाठी घरी थांबणे ही लक्ष्मणरेषा ओलांडून आपण रावणाच्या हवाली गेलोच आहोत. तेव्हा वेळ अजूनही गेलेली नाही. खचून न जातो, ही लंका जाळण्यासाठी डॉक्टर, प्रशासन, सरकार सेतू उभारून तुमच्यापर्यंत पोहचेल, तुमची व्यवस्थित सुटका करून कोरोनाची लंका जाळणार आहे. त्यासाठी आता स्वतःची काळजी घेताना, कोरोनाला विसरून जगताना, सरकारचे ऐकायलाच हवे. कारण पावसाळ्यातील धोका पाहता गांभीर्याने जगण्याची गरज आहे. मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज परमेश्वर ऐकतो, असे म्हणतात. मग तुम्ही-आम्ही त्याला आर्त साद घातलीत तर तो नक्कीच ऐकेल. पण, तो जसा भावग्राह्य आहे, तसा प्रयत्नवादाचा पुरस्कर्ता आहे. तो निश्चितच खाटल्यावर बसून देणारा नसला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणाच्या तरी रूपाने तेसुद्धा लाड त्याने पुरविले आहेत.
आता मनाची शक्ती वाढविण्यासाठी विश्यपना करा, साधना करा, मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी गौतमबुद्धांनी सुचविलेल्या शांतीचा मार्ग अवलंबा. साधूसंतांनी चोखळलेल्या मार्गाने जात नवविधा भक्तीचा अंगिकार करा, जैन तिर्थकारांनी सांगितलेला नवकार मंत्र म्हणा. भुकेल्यांच्या पोटाला आधार देत लंगर वाटप करणार्या गुरूद्वारातील गुरू गोविंदसिंह, गुरूनानक, गुरूग्रंथसाहेबांचा वाहे गुरू का खालसा, वाहे गुरू की फत्तेहचा मंत्रघोष करा, अगदी कुराणाच्या मंत्रातील 24 आर्यांनी तयार झालेली अजान असेल, बायबलमधील प्रार्थना असेल. प्रत्येकाच्या जीवनाचा हा पंथिय मार्ग अवलंबून जे सामर्थ्य मिळविण्याचा प्रयत्न कराल, तीच खरी इम्युनिटी, तीच खरी रोगप्रतिकार शक्ती असेल. ती पवित्र बत्तीस संजीवनींची महासंजिवनी तुमच्यामध्ये आहे. तिचे स्मरण करून कोरोनाला त्याच्या बत्तीस पिढ्यांसह मुळासहित उखडून फेकून द्यायला शिका.
कोरोनाचा समुळ नाश करणारी महासंजीवनी!
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
सत्संग म्हणजे काय? ........................... - कांतीलाल कडू ............................ एकदा ब्रह्मश्री नारद भ्रमंती करत करत, नारायणाचा ज...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...